वसई : वसईच्या मिठागरामध्ये यंदाच्या हंगामातील पांढरे शुभ्र मीठ तयार झाले असून, विक्रीसाठी ते राज्यातील विविध भागांसह गुजरातमधील बाजारपेठेत पाठवण्यात येत आहे. त्यासाठी मीठ उत्पादकांची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
वसई-विरार भागातील मीठ उत्पादन हा पारंपारिक व्यवसाय आहे. राजावळी, नवघर पूर्व, जुचंद्र, उमेळा, नायगाव, पाणजू यासह इतर ठिकाणच्या भागात मीठाचे उत्पादन घेतले जाते. दिवाळीनंतर वसईच्या मिठागरात चोपणे, पाणी जमाकरणे, त्याची योग्य ती डिग्री तयार करणे, अशा मीठ पिकविण्यासाठीच्या विविध प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आता कडक्याचे पडणारे ऊन, यामुळे खारट पाण्याची आवश्यक ती डिग्री तयार होऊन मीठ तयार होऊ लागले आहे. सध्या तयार झालेल्या मिठाच्या मजुरांच्या साहाय्याने राशी तयार करण्यात येत असून, त्याची वाहतूकही सुरू झाली आहे.
या मिठागरातून पिकवलेले मीठ हे मुंबई, गुजरात, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पंढरपूर येथील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जात आहे. त्यासाठी वसईत व्यापारी गाडय़ा घेऊन दाखल होऊ लागले आहेत. यंदाच्या वर्षी दोन हजार ३०० रुपये इतका प्रति टन भाव मिळत असल्याचे मीठ उत्पादक हेमंत घरत यांनी सांगितले.
मीठ उत्पादन निम्म्यावर
खाडय़ांचे पाणी दूषित झाल्यामुळे पाण्यातील खारटपणा कमी झाला आहे. तर, दुसरीकडे कामगार कमतरता, उत्पादन खर्चात झालेली वाढ, बाजारमंदी, पूरस्थिती, वातावरण बदलाचा फटका, अशा एक ना अनेक कारणांमुळे मीठ उत्पादन करण्याचे प्रमाण आता फारच कमी झाले आहे. या आधीच्या तुलनेत हेच उत्पादन निम्म्यावर आले असल्याचे मीठ उत्पादकांनी सांगितले आहे.