५० हजार नागरिकांची लस घेण्यास टाळाटाळ

करोनाने जगभर थैमान घातले असून लाखो लोकांचे बळी घेतले आहेत.

vaccination-14
(प्रातिनिधीक फोटो)

|| सुहास बिऱ्हाडे

वसई-विरारमध्ये हजारो लशींचा साठा पडून, केंद्रांवर शुकशुकाट 

वसई : करोनापासून बचाव करण्यासाठी करोना प्रतिबंधक लस हाच सर्वोत्तम उपाय असला तरी वसई-विरारमधील तब्बल ५० हजारांहून अधिक नागरिकांनी करोना लस घेण्यास टाळाटाळ केली आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. वसई-विरार महापालिकेकडे लशींचा मुबलक साठा असूल ८० हजारांहून अधिक लशी शिल्लक आहेत. या नागरिकांचे मन वळविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले असून नागिरकांच्या दारात आणि २४ तास लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

करोनाने जगभर थैमान घातले असून लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. करोनाला रोखण्यासाठी करोना प्रतिबंधक लस तयार करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासून या लशींच्या दोन्ही मात्रा १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत देण्यात येत आहेत. सध्या पालिकेकडे लशींचा मुबलक साठा असला तरी लस घेण्यासाठी नागरिक आता पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे लस केंद्रांत शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पालिकेने नागरिकांच्या घरोघरी जाऊन लस घेण्याबाबात जनजागृती सुरू केली होती. यावेळी केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिकेने एका आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणात ५० हजारांहून अधिक लोकांनी आम्हाला लस नको असे सांगितले आहे.

याबाबत माहिती देताना पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले की, लशी मुबलक असल्या तरी नागरिक ती घेण्यासाठी येत            नव्हते. त्यामुळे आम्ही घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले होते. एक मोठा वर्ग लशीबाबत साशंक असल्याचे दिसून  आले.

करोना अस्तित्वात नाही, हे जागतिक षडयंत्र आहे असे अनेकांनी सांगितले. विशिष्ट समुदायात तर लस घेऊच नये असा मतप्रवाह आहे. यासाठी त्यांच्या धर्मगुरूंना भेटून मन वळविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. लशींची सक्ती कुणावर करता येत नाही, मात्र याबाबत लोकांना सकारात्मक करण्याचे आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी देखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. लशींची पहिली मात्रा घेण्यासाठी लोक अनुत्सुक असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरण दारात

वसई-विरार शहराची लोकसंख्या २२ लाख गृहीत धरण्यात आली आहे. वसई-विरार शहरात आतापर्यंत एकूण ८२.२८ टक्के लसीकरण झाले आहे. त्यात पहिली मात्रा ५०.६ टक्के जणांना तर दुसरी मात्रा ३१.६ टक्के लोकांना देण्यात आली आहे.   पालिका दररोज ७० केंद्रांवर ३० हजारांहून अधिक लशी उपलब्ध करून देत आहे. मात्र केंद्रावरच्या लशी संपत नसल्याचे पालिकेने सांगितले. आमच्या केंद्रावर दररोज अडीच ते तीन हजार लशी येतात. परंतु जेमतेम शंभर ते दीडशे  संपतात अशी माहिती बोळिंज केंद्रातील डॉक्टरांनी दिली. अधिकाअधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी पालिकेने विविध मोहिमा सुरू केल्या आहेत. त्यानुसार  घराजवळ फिरते लसीकरण, शनिवार आणि रविवार २४ तास सुरू राहणारे लसीकरण, रात्रीचे लसीकरण अशा मोहिमा सुरू केल्या आहेत.

सर्वांनी लस घ्यावी. करोना प्रतिबंधक लशी या शंभर टक्के सुरक्षित असून वसई-विरारमधील नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.- गंगाथरन डी.-  आयुक्त, वसई-विरार महापालिका

एक वर्ग लस घेण्याबाबत उदासीन आहे. प्रत्येक नागरिकांना सहज लशी मिळाव्यात यासाठी विविध मोहिमा राबवत आहोत.     – डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thousands of vaccines have been stockpiled in vasai virar corona virus infection vaccine akp

Next Story
रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती
ताज्या बातम्या