वसई : नालासोपारा पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आलेले आरोपी ट्रेनमधून पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्याची घटना घडली आहे. उत्तरप्रदेशातील इटावा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित ३ आरोपी फरार आहेत.

मोहम्मद अनीस, रेहान फारुकी आणि अकील अहमद या तीन आरोपींविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात फसवणूकीसह विविध गुन्हे दाखल होते. नालासोपारा पोलीसस ठाण्याचे उपनिरीक्षक मिलिंद तायडे आणि हर्षल राऊत यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने उत्तरप्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातून या आरोपींना अटक केली होती. सोमवारी त्यांना स्थानिक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन नालासोपारा येथे आणले जात होते. गाझीपूर वांद्रे एक्स्प्रेस गाडीतून पोलीस पथक आरोपींसह येत होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास इटावा स्थानकापूर्वी इकदिल स्थानकावरून ट्रेन जात असताना, तीन आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की केली आणि हातकडीसह चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळ काढला. इटावा स्थानकात ट्रेन थांबल्यावर नालासोपारा पोलिसांनी घटनेची माहिती इटावा रेल्वे पोलिसांना दिली. या नंतर फरार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली.

हेही वाचा…हत्येपूर्वी तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही;  मयत आरती यादवच्या बहिणीचा पोलिसांवर आरोप

आरोपींना अटक करून आणण्याची प्रक्रिया तीन दिवस सुरू होती. ट्रेनमधून पहाटेच्या वेळी आरोपींना पलायन केले होते. एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती नालासोपारा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे यांनी दिली.