भाईंदर : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात भाईंदर येथील एका कुटुंबातील पती, पत्नी आणि तरुण मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालवत असलेला मुलगा व त्याचा भाऊ असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानी दर्शन घेऊन परतताना हा अपघात घडला आहे.
भाईंदरच्या नवघर येथे राहणारे चौधरी कुटुंब मंगळवारी सकाळी नाशिकमधील त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेले होते. तर दुपारी नाशिकहून परतताना समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ सुरेश चौधरी यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार समोरील अवजड मालवाहू वाहनाला धडकले. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पूर्णपणे चुराडा झाला. या भीषण अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या पाचही जणांना गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात जयसाराम चौधरी (५०), त्यांची पत्नी हंसी चौधरी (४४) आणि मुलगी पूजा चौधरी (२०) या तिघांचा मृत्यू झाला असून मृत जयसाराम चौधरी यांचे भाऊ सुरेश चौधरी आणि नरेश चौधरी यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे भाईंदर परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच चौधरी कुटुंबीय मूळचे राजस्थानचे असून मृतांवर अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

