scorecardresearch

मोखाडय़ामध्ये वृद्धेवर वाघाचा हल्ला; पतीच्या धाडसामुळे जीव वाचला

मोखाडा तालुक्यातील पारध्याची मेट येथील वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला केला असल्याची गंभीर घटना  १८ मार्च  रोजी रात्री दहा वाजता घडली.

कासा: मोखाडा तालुक्यातील पारध्याची मेट येथील वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला केला असल्याची गंभीर घटना  १८ मार्च  रोजी रात्री दहा वाजता घडली.तिथेच उपस्थित असलेल्या तिच्या पतीने दाखवलेल्या समयसूचकता व धाडसामुळे महिलेचे प्राण थोडक्यात बचावले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील पारध्याची मेट येथील शेतावर राहणाऱ्या काशिनाथ सापटे ( ७२) व त्यांची पत्नी पार्वती सापटे  (६५) हे रात्री झोपले असताना बाहेर कसला तरी आवाज आला. ते पाहण्यासाठी पार्वती सापटे  घराबाहेर पडताच अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला. यावेळी तिने जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केली. तिचा आवाज आल्यावर  पती काशिनाथ सापटे यांनी वाघाचा प्रतिकार करून आपल्या पत्नीला वाघाच्या तावडीतून सोडविले.

 मात्र वाघाने पळून न जाता तिथेच बस्तान मांडले होते.  हे पाहून या दाम्पत्यांनी आरडाओरड केली, त्यांचा आवाज ऐकून पारध्याची मेट येथील ग्रामस्थांनी धाव घेऊन, वाघाला पिटाळून लावले. मात्र वाघ काही तासाने परत एकदा गावाकडे येताना ग्रामस्थांना दिसला. यानंतर ग्रामस्थांनी दूरध्वनीद्वारे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून स्थानिक तरुणासोबत रात्रभर गस्त घातली. वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र निकम यांनी सबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. वाघाच्या हल्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच ग्रामस्थांकडून पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला आहे. नागरिक जरी वाघ म्हणत असले तरी वाघ सहसा मनुष्यवस्तीकडे येत नाही, त्यामुळे ज्याने हल्ला केला तो बिबटय़ा असण्याची शक्यता असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. हल्ल्यात जखमी महिलेवर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वाघ, बिबटे यापासून संरक्षण व्हावे यासाठी नागरिकांनी रात्रीच्या वेळी व जंगलात जाताना एकटय़ा दुकटय़ाने न जाता समूहात जावे तसेच आरडाओरडा करत जावे म्हणजे बिबटय़ा किंवा वाघ हल्ला करत नाही, अशा सूचना वन विभागाने दिल्या आहेत.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiger attack old man mokhadya her husbands courage saved life poshera gram panchayat amy

ताज्या बातम्या