वसई: वसई विरार मधील खाड्यामध्ये दुर्गंधीयुक्त पाणी सोडणे, केरकचरा, निर्माल्य फेकणे असे प्रकार अजूनही सुरुच आहेत. या प्रकारामुळे शहरातील खाड्या प्रदूषित होऊ लागल्या आहेत. यामुळे खाडीच्या पाण्यात हव्या त्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने हळूहळू पारंपारिक मासेमारी धोक्यात येऊ लागली आहे.
वसईच्या विविध ठिकाणच्या भागात नैसर्गिक खाड्या आहेत. या खाडीच्या पाण्यात ही बोय मासा, खाजरी, कोळंबी, मोरी, काळे मासे, चिवणी यासह विविध प्रजातीचे मासे आढळून येतात. त्यामुळे या पाण्यातही स्थानिक मच्छिमार मासेमारी करतात. व त्या मासे विक्रीतून रोजगार मिळवितात. मात्र मागील काही वर्षांपासून वसई विरार भागातील खाड्यांची अवस्था फारच बिकट बनली आहे.
वाढत्या नागरीकरणा व औद्योगिकीकरण यामुळे खाड्यात दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस असा प्रकार वाढत असल्याने खाड्या या प्रदूषित झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
याशिवाय प्लास्टिक, निर्माल्य यासह इतर कचरा ही खाडीत टाकून दिला जात असल्याने खाड्यां मधील प्रदूषण वाढू लागले आहे.
या प्रदूषणाचा मोठा परिणाम खाडीत असलेल्या मत्स्य प्रजातींवर होऊ लागला आहे. विशेषतः पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागासह नागरिक खाडीतील मासेमारी करण्याकडे वळतात या हंगामी मासेमारीतून ही त्यांना चांगला रोजगार मिळतो. पावसाळ्यात खोल समुद्रातील मासेमारीला बंदी असल्याने खाडीतून पकडलेल्या मासळीला अधिक मागणी असते. त्यामुळे खाडीतील मासेमारी वर मच्छीमारांचा अधिक भर असतो. मात्र खाड्यामधील प्रदूषणामुळे मासेमारीवर त्याचा परिणाम झाला असल्याचे मच्छिमार सांगत आहेत.पूर्वी चांगल्या दर्जाची मासळी मिळत होती. आता मात्र त्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे.
खाड्यांमधील वाढते प्रदूषण हे धोकादायक ठरू लागले आहे.यामुळे पर्यावरणाची तर हानी होतच आहे. याशिवाय येथील स्थानिक पारंपारिक मासेमारी करतात त्यांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. :- सुशांत पाटील, अध्यक्ष भूमिपुत्र फाऊंडेशन
खाड्या संवर्धनाची गरज
खाड्यातील पात्रात विविध प्रजातीचे मासे आहेत.माश्यांची एक प्रजाती ही साधारपणे हजार ते लाखोंच्या संख्येने अंडी घालतात. तसेच या प्रजातीच्या वाढीसाठी पोषक वातावरण गरजेचे आहे. परंतु सध्याच्या घडीला पालघर जिल्ह्यातील बहुतांश खाड्यांच्या पात्रात दुर्गंधीयुक्त सांडपाणी, प्लास्टिक ,केरकचरा यातून प्रदूषण तयार होत असते या प्रदूषणामुळे माश्यांची वाढ होत नाही किंवा त्यांची प्रजाती तयार होण्यापूर्वीच मृत होतात. हा सर्व प्रकार थांबवायचा असेल तर खाड्यांचे संवर्धन होणे गरजेचे असे नागरिकांनी सांगितले आहे.
सध्या केवळ एकच सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित
वसई, विरार शहरात ७ सांडपाणी प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. वसई विरार महापालिका क्षेत्रातून दररोज २७२ दशलक्ष लिटर्स एवढे सांडपाणी निर्माण होत आहे. त्यापैकी बोळींज येथील सांडपाणी प्रकल्पात (क्रमांक २) ३० दशलक्ष लिटर्स पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र इतर सर्व सांडपाणी प्रक्रियेविनाच खाडी मार्गे समुद्रात सोडले जात आहे.