वसई: घोडबंदर घाटात पडलेले खड्डे यासह राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पडलेले खड्डे याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होऊ लागला आहे.  सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सुद्धा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई, ठाणे, गुजरात अशा दिशेने जाणाऱ्या दोन्ही मुख्य वाहिन्या कोंडीत सापडल्याने प्रवाशांचे हाल  झाले आहेत.

वसई विरार शहराच्या पूर्वेच्या भागातून मुंबई, ठाणे, पालघर, गुजरात यासह विविध विभागाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावर आता वर्सोवा पुलापासून ते वसई फाटा या दरम्यानची कोंडीची समस्या नित्याचीच होऊन बसली आहे.

शनिवारी सकाळी चार वाजल्यापासून पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. घोडबंदर पासून ते वसई फाटा या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत तर दुसरीकडे गुजरात वाहिनीवर कोंडी झाली आहे. त्यामुळे मागील सात ते आठ तासापासून प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले आहे. घोडबंदर घाटात पडलेले खड्डे व महामार्गावर अन्य ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे. त्यातच अवजड वाहतूक करणारी मालवाहतूक वाहने बंद पडण्याच्या घटना समोर येत आहेत. त्याचाच मोठा परिणाम वाहतुकीवर होऊ लागला आहे.

या फटका प्रवाशांना बसू लागला आहे. वाहतूक अगदी कासवगतीने पुढे सरकत आहे त्यात इंधन ही मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. सातत्याने निर्माण होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर प्रशासनाने तोडगा काढावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

स्थानिकांची कोंडी

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत अनेक छोटी मोठी गावे आहेत.  त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक राहतात मात्र महामार्गावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे त्यांचे दैनंदिन दळणवळण बंद झाले आहे. शाळकरी विद्यार्थी, अन्य नागरिक यांना घराच्या बाहेरही पडता येत नाही असे नागरिक भरत पाटील यांनी सांगितले आहे.

पदयात्रा आंदोलन करणार

घोडबंदर येथील गायमुख भागात खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. यापूर्वी सुद्धा पाच ते सहा दिवस वाहतूक बंद ठेवून रस्त्यांची डागडुजी केली होती. मात्र तरी सुद्धा रस्त्यांची दयनीय स्थिती झाली आहे. त्यामुळे दररोज या भागातून येता जाता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या कोंडीची रांग वर्सोवा पुलापासून ते अगदी वसई पर्यँत जाते त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. या निषेधार्थ पदयात्रा आंदोलन करून पोलीस आयुक्तांना निवेदन दिले जाणार असल्याचे सुशांत पाटील यांनी सांगितले आहे.