लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ७.४५ ते ११. ४५ पर्यंत वरसावे पुलाजवळील चौकीनंतर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना सोमवारी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने प्रसिध्द केली आहे.

दहिसर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. यासाठी राज्य शासनाने चारचाकी हलक्या वाहनांना पथकर माफी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतरही दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नव्हता. टोल नाक्यावर अवजड वाहनांना तीन मार्गिका राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.

याआधी मुंबई शहरात प्रवेश करणार्‍या अवजड वाहनांना सकाळी ८ ते ११.३० सुमारास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अवजड वाहने टोलनाक्याच्या अलीकडे उभी राहत होती. परिणामी दहिसर टोलनाक्यावर वाहतूक कोंडी व्हायची. त्यामुळे ही समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ७.४५ ते ११. ४५ पर्यंत वर्सोवा पुला जवळील चौकीनंतर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरसावे पोलीस चौकी फाऊटन हॉटेल ते दहिसर टोलनाका तसेच ठाणे घोडबंदर मार्गे मिरा भाईंदर शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

यामुळे मिरा भाईंदर आणि ठाणे शहरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागणार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सुहास बावचे यांनी ही अधिसूचना प्रसिध्द केली आहे.

बंदी कुणाला- अवजड वाहने

किती वाजता- सकाळी ७.४५ ते ११. ४५

कुठे बंदी- वरसावे पोलीस चौकी फाऊटन हॉटेल ते दहिसर टोलनाका

मंत्र्यांच्या इशार्‍यानंतर यंत्रणा सक्रीय

सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोल नाक्याची पाहणी करून ही समस्या न सुटल्यास टोल नाका फोडून टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि अवजड वाहनांना बंदी घालण्याची अधिसूचना सोमवारी पोलिसांकडून प्रसिध्द करण्यात आली.

Story img Loader