भाईंदर :- घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी येथील घाट मार्गाच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासाठी वनविभाग व कांदळवन विभागाची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याने महापालिकेला काम सुरू करता आलेले नाही.

ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. याशिवाय या मार्गावरून मुंबई, वसई, विरार, भाईंदर भागात जाणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाणही मोठे आहे. मात्र त्या तुलनेत हा रस्ता अरुंद असून त्यावर अनेक वळणे व चढ-उतार आहेत. परिणामी येथे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.म्हणूनच फाउंटन हॉटेल ते गायमुखदरम्यानचा सुमारे साडेचार किलोमीटर लांबीचा, सध्या ३० मीटर रुंदीचा रस्ता ६० मीटरपर्यंत रुंद करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

महापालिकेने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले असले तरी हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व कांदळवन परिसरातून जात असल्याने, दोन्ही विभागांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने शासनाच्या वनविभाग व कांदळवन विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र अद्याप परवानगी न मिळाल्यामुळे पुढील काम रखडले असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन मुकणे यांनी दिली

विकास हक्क प्रमाणपत्राद्वारे हस्तांतरण

या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खासगी जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. मिरा-भाईंदर महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे जागा मालकांना विकास हक्क प्रमाणपत्र (टीडीआर) देऊन हे काम करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.