वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाकडून लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे देयक न भरल्याने येथील अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत.  रात्रीच्या सुमारास महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. वसई पूर्वेतील भागातून हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावरून दररोज मुबंई व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते.  रात्रीच्या सुमारास वाहनचालकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी अनेक ठिकाणी पथदिवे लावण्यात आले होते.

मात्र प्राधिकरणामार्फत या पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती योग्यरीत्या केली जात नाही. घोडबंदर ते शिरसाड फाटा या दरम्यान असलेल्या अनेक ठिकाणी पथदिवे बंद असतात. तर काही ठिकाणच्या विद्युत दिवे फुटून गेले आहेत, त्यामुळे रात्रीच्या सुमारास येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा धोकादायक प्रवास सुरू असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.  त्यातच आता विविध ठिकाणी खड्डेही पडले आहेत.

अंधार असल्याने खड्डे दिसून येत नसल्यानेही अपघाताचा धोका संभवतो. विशेषत: या पथदिव्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचे देयके भरले नसल्याने या महामार्गावरील पथदिवे बंद असल्याचे मंगळवारी खासदार राजेंद्र गावित यांनी वसईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उघड झाले आहे. यावेळी महामार्गावरील विविध प्रकारच्या समस्येवर भाष्य केले. त्यात पथदिव्याअभावी रात्रीच्या सुमारास होणाऱ्या वाहनचालकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  अनेकदा छोटय़ा- मोठय़ा अपघाताच्या घटनाही घडतात. यासाठी महामार्गावरील समस्या प्राधिकरणाने लवकरात सोडवाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून वेळोवेळी आढावा घेण्यात येत असल्याचे गावित यांनी सांगितले आहे. येत्या १५ दिवसांत या सर्व समस्या सोडविण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

उड्डाणपुलाखालीही अंधार 

वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या महामार्गावर तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या खालील मार्गात पथदिवे लावण्यात आले नाहीत. यात चिंचोटी, मालजीपाडा, नायगाव, ससूनवघर यासह इतर ठिकाणच्या उड्डाणपुलाखाली अंधाराचे साम्राज्य असते. परंतु याकडे महामार्ग प्राधिकरण विभागाने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळेस या अंधारातून वाट काढावी लागत आहे.