ई चलनाद्वारे केलेल्या कारवाईतील दंड भरण्याकडे वाहनचालकांचे दुर्लक्ष

वसई: वसई-विरार व मीरा-भाईंदर शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी ई चलनाद्वारे कारवाई केली आहे. मात्र या कारवाईचा दंड भरण्याकडे हजारो वाहनधारकांनी पाठ फिरवल्याने कोट्यवधी रुपयांचा दंड प्रलंबित आहे. त्यामुळे दंड न भरणाऱ्या वाहनचालकांची प्रकरणे आता वाहतूक पोलिसांनी लोकन्यायालयासमोर ठेवली आहेत.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन व बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जाते.  ई चलन प्रणाली कार्यान्वित झाल्यापासून  ही कारवाई इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरू केली आहे. तसेच ई चलन पद्धतीने कारवाई होत असल्याने दंड भरण्याची जबाबदारी ही वाहनचालकांवर सोपविण्यात आली आहे. काही जण कारवाई होऊनसुद्धा दंडाची रक्कम भरत नाहीत. त्यामुळे वाहतूक विभागाचा कोट्यवधी रुपयांचा दंड हा थकीत राहिला आहे. हा दंड भरावा अशी वाहतूक पोलीस वारंवार सूचना करतात. मात्र तरीही त्याला कोणताही प्रतिसाद देत नाहीत.

मागील सहा महिन्यात वसई-विरार व मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मीरा रोड, वसई – विरार या तीन झोनमध्ये नियमांचे उल्लंघन केलेल्या कारवाईची ३३ हजार ई चलन प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे कोट्यवधीचा दंड हा थकीत राहिला आहे. वाहनचालक दंड भरण्यासाठी पुढे येत नसल्याने वाहतूक पोलिसांनी आता लोकन्यायालयात धाव घेतली आहे. ई चलन संदर्भातील प्रकरणे लोक न्यायालयाच्या समोर ठेवली आहे. ही प्रकरणे वसई व ठाणे येथील लोकन्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

दंड न भरणाऱ्या ३३ हजार वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी लोक न्यायालयाची नोटीस  समाजमाध्यमातून संदेश (एसएमएस) द्वारे पाठवली आहे. वसई न्यायालयात   २५ सप्टेंबर   रोजी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले आहे. त्यात ई चलन कारवाई प्रकरणे  निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

ई चलन कारवाई करण्यात आलेले वाहनधारक हे दंड भरण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे आता ही सर्व प्रकरणे लोकन्यायालयाच्या समोर ठेवली आहेत. वाहनधारकांना तशा नोटिसाही एसएमएसद्वारे पाठविल्या आहेत.

– शेखर डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक, वसई