वसई : वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कचऱ्याच्या ढीगांना आगी लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. या आगीचा धूर सर्वत्र पसरत असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना महामार्गावरून धुरातून प्रवास करावा लागत आहे.

वसई पूर्वेतील भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग गेला आहे. महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात मोठय़ा प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या टाकलेल्या कचऱ्याच्या ढीगांना आगीही लावल्या जात आहेत. कचऱ्यात विविध प्रकारचे प्लास्टिक गोणी, थर्माकोल, रबर, इतर टाकाऊ कचरा असतो. या कचऱ्याला आग लावली की ती सातत्याने धुमसत असते.

महामार्गाजवळील तानसा नदीजवळच्या भागात, चिंचोटी, पेल्हार, सातिवली, बापाणे फाटय़ाजवळ अशा विविध ठिकाणी असे आगी लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. याकडे महामार्ग प्राधिकरणाकडून व पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसतो. कोणत्याही वेळी दुर्गंधीयुक्त धूर परिसरात धुमसत असतो. कधी कधी हवेमुळे आगीचा धूर इतका तीव्र असतो की समोर चालले वाहनही दिसत नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यताही असते. विशेष करून रात्रीच्या सुमारास ही समस्या अधिकच गंभीर बनत असते यासाठी आगी लावून प्रदूषण पसरविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.