मीरा-भाईंदर महानगरपालिका ‘त्या’ प्रवाशाच्या शोधात

भाईंदर : दक्षिण आफ्रिकेतून मीरा-भाईंदर शहरात आलेल्या नऊ प्रवाशांपैकी एक प्रवासी करोना चाचणी न करताच गोव्याला रवाना झाला आहे, तर उर्वरित आठ प्रवाशांसह त्यांच्या कुटुंबीयांची करोना चाचणी करून अहवाल नकारात्मक आला आहे. मात्र त्या एका प्रवाशाच्या शोधात पालिका प्रशासन जुंपले आहे.

सध्या आफ्रिका देशात करोना आजच्या नव्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा प्रसार देशात होऊ नये म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत. त्यात पालिका प्रशासनाकडूनदेखील विदेशातून आलेल्या नागरिकांची करोना चाचणी करून त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्याकडे भर देण्यात येत आहे. त्यानुसार १२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत आफ्रिका व झिम्बाब्वे या देशांतून मीरा-भाईंदर शहरात नऊ प्रवासी आल्याची माहिती महानगरपालिकेला प्राप्त झाली होती.

त्यामुळे या प्रवाशांपैकी आठ प्रवाशांना पालिकेने तात्काळ संपर्क साधून करोना चाचणी केली. तसेच या प्रवाशांच्या एकूण १६ कुटुंबीयांचीदेखील चाचणी करून या सर्वाना अलगीकरण कक्षात स्थलांतरित केले. या सुदैवाने या सर्वाचा नकारात्मक आला आहे. मात्र यातील एक प्रवासी पालिकेच्या हाती न येताच गोव्याला निघून गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रवाशाच्या शोधात प्रशासन लागले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक दिवसापूर्वीच पालिकेने नऊ प्रवासी हे नकारात्मक असल्याचे पत्रक काढून जाहीर केले होते. मात्र राज्याच्या आरोग्य विभागाने एक रुग्ण मीरा-भाईंदर शहराचा असल्याचे जाहीर केल्यानंतर त्या चाचणी न केलेल्या प्रवाशाची शोधमोहीम सुरू असल्याचे नवे पत्रक पालिकेने प्रसिद्ध केले आहे.