वसई- विरार महापालिकेने मोफत आरोग्य सेवा सुरू केली आहे. मात्र यात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांकडून बाहेरील औषधे खरेदी करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार मोफत परंतु औषधे महाग अशी स्थिती निर्माण झाली आहे.

वसई, विरार शहरात पालिकेची तीन रुग्णालये, तीन माता बालसंगोपन केंद्रे, २१ आरोग्य केंद्रे आहेत. या मार्फत शहरातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जात आहे. यासाठी पालिकेकडून दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. असे जरी असले तरी पालिकेच्या काही आरोग्य केंद्रात कार्यरत डॉक्टरांकडून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिली जात असल्याचे प्रकार घडू लागले आहेत. नुकताच नालासोपारा तुिळज येथील रुग्णालयात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुरज बाघेल या डॉक्टरकडून रुग्णाला बाहेरून औषध लिहून सांगण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पालिका आरोग्य सेवा देण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून यंत्रणा व औषध साहित्य खरेदी करते असे असताना रुग्णांना बाहेरील औषधे का लिहून दिली जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डॉक्टर स्वत:च्या आर्थिक लाभासाठी असे प्रकार करीत असून यात सर्वसामान्य रुग्णांची लूट करीत असल्याचा आरोप भाजपचे अशोक शेळके यांनी केला आहे. याकडे पालिकेच्या वैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार सरार्सपणे सुरू आहेत. तसेच याबाबत शेळके यांनी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे तक्रार करून पालिकेच्या रुग्णालयात सुरू असलेला प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. यावर वैद्यकीय विभागाचे उपायुक्त विजयकुमार द्वासे यांनी तुिळज रुग्णालय येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुरज बाघेल यांना रुग्णांना बाहेरील औषधे लिहून देऊ नये असे आदेश दिले आहेत. जर रुग्णांना स्वत:हून बाहेरील औषधे पाहिजे असल्यास तसे रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांचेकडून लिहून घेण्यात यावे असेही त्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

पगार पूर्ण, सेवा अपूर्ण
महापालिकेच्या विजयनगर येथील तुळिंज रुग्णालयात तीन अस्थिरोगतज्ज्ञ आहेत. यापूर्वी त्यांना सेवेत असताना मासिक ५५ हजार रुपये इतके वेतन दिले जात होते. त्यांनी पालिकेच्या सेवेत पूर्णवेळ राहावे यासाठी ८० ते ८५ हजार रुपये इतके वेतन दिले जात असे. असे असताना आठवडय़ातून दोन वेळा ती देखील दिवसाला केवळ दोन तास सेवा देत आहेत. आरोग्य विभागाकडून पूर्ण वेळ कामाचे वेतन घेऊन काही क्षुल्लक तास सेवा देणार असतील आणि याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होणार असेल तर ही चिंतेची बाब आहे. याकडे पालिकेने लक्ष देऊन सदर प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अशोक शेळके यांनी केली आहे.