भाईंदर : पश्चिम येथील मिरा भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयासमोरच झाडांना केबल तारांचा विळखा बसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे पर्यावरणप्रेमी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
मिरा भाईंदर शहरात झाडांवर विद्युत रोषणाई, केबल तार किंवा खिळे लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात ठरावही मंजूर करण्यात आला असून प्रशासनाला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरणप्रेमींनी केलेल्या तक्रारीनंतर अधूनमधून कारवाई होत असली तरी या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने झाडांचा वारंवार छळ केला जात असल्याचे स्पष्ट दिसून येते.
धक्कादायक बाब म्हणजे, आता महापालिका मुख्यालयासमोरची झाडेही सुरक्षित राहिलेली नाहीत. या झाडांच्या मुळांपासून खोडांपर्यंत मोठ्या प्रमाणावर केबल तारांचा वापर करण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे, तर झाडांसाठी खणलेल्या खड्ड्यांमध्ये भूमिगत तारा देखील बसवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारामुळे झाडे मरणपंथाला जाण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. पालिकेने झाडांना विळखा घालून केबल तारांचा विस्तार करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
कारवाई सुरू असल्याचा दावा
मिरा भाईंदर शहरात झाडांवर केबल तार, जाहिराती किंवा विद्युत रोषणाई करणाऱ्यांवर प्रभागस्तरावर तसेच वृक्ष प्राधिकरण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. अनेक प्रकरणांमध्ये प्रशासनाने थेट पोलिस ठाण्यात गुन्हेही नोंदवले आहेत. सध्या देखील झाडांचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.