विद्युत, अग्नी आणि संरचनात्मक लेखा परीक्षण पूर्ण

वसई : शहरातील रुग्णालयांच्या सुरक्षिततेसाठी मीरा-भाईंदर पालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखा परीक्षण, (फायर ऑडिट) संरचनात्मक लेखा परीक्षण अहवाल (स्ट्रक्चरल ऑडिट) आणि विद्युत लेखा परीक्षण (इलेक्ट्रिक ऑडिट) पूर्ण केले आहे. अशा तिन्ही प्रकारांत सर्व रुग्णालयांचे लेखा परीक्षण करणारी मीरा-भाईंदर ही एकमेव महापालिका ठरली आहे. यामुळे रुग्णालयांना तिहेरी सुरक्षा कवच प्राप्त झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील खासगी आणि पालिका रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर बनला आहे. अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ११ जणांचा बळी गेला होता. पुण्याच्या खासगी रुग्णालयात प्राणवायू गळती होऊन अनेक रुग्णांचे बळी गेले होते. तर एप्रिल महिन्यात विरारच्या विजयवल्लभ या खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमी वर मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालांची सुरक्षा यंत्रणा तपासून घेतली आहे. शहरात एकूण १६२ खासगी रुग्णालये आहेत. पालिकेने केवळ त्या रुग्णालयांची अग्निसुरक्षा केली नाही तर रुग्णालयांच्या इमारतीचा संरचनात्मक लेखापरीक्षण अहवाल आणि विद्युत लेखा परीक्षणदेखील पूर्ण केले आहे.

शहरातील सर्व रुग्णालयांच्या तिहेरी सुरक्षा लेखा परीक्षणाची तपासणी राज्याच्या आपत्ती व्यस्थापन विभागाने करून ५२ गुण देण्यात आले आहेत. एवढे सर्वाधिक गुण प्राप्त करणारी मीरा भाईंदर महानगरपालिका राज्यात सर्वात पुढे असल्याची माहिती पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले की, राज्यातील अग्नितांडवाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमी वर आम्ही रुग्णालयांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले होते. सर्व करोना रुग्णालये, करोना केंद्रांच्या बाहेर २४ तास अग्निशमन वाहन सज्ज ठेवले होते. याशिवाय शहरात असेलल्या सर्वच्या सर्व १६२ रुग्णालयांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण, विद्युत लेखा परीक्षण आणि इमातीच्या बांधकामाचा दर्जा तपासणारे संरचनात्मक लेखा परीक्षण पूर्ण करून घेतले आहे. यामुळे या रुग्णालयांना तिहेरी सुरक्षा कवच प्राप्त झाले आहे.