वसई: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर आता वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध जोरदार कारवाई सुरू केली आहे. मागील अठरा दिवसात १८ दुकानांना टाळे ठोकत १४ लाखांचा भेसळयुक्त मुद्देमाल जप्त केला आहे. यात १९ जणांना अटकही करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतरराज्यात भेसळ माफिया व गुटखा विक्रेते यांचे धाबे दणाणले आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याच अनुषंगाने वसई विरार शहरातही अन्न व औषध प्रशासनाची पथके सक्रिय झाली आहेत. २७ मे पासून विविध ठिकाणी धाडी टाकून भेसळयुक्त साठा जप्त केला जात आहे.
खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त
जुमहापालिका कार्यक्षेत्रातील ३ वेगवेगळ्या आस्थापनांवर (दुकानांवर) छापे टाकण्यात आले. यावेळी तब्बल ४,७९८ किलो ९ लाख ९४ हजार ६९८ रुपये किंमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. हे खाद्यतेल आरोग्यास घातक असलेल्या जुन्या आणि पुनर्वापर केलेल्या डब्यांमध्ये भरण्यात आले होते. तसेच हे तेल शासनाच्या ठरवून दिलेल्या मानकांनुसार नसल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आले असून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
निकृष्ट दर्जाचे आईस्क्रीमही जप्त
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या आईस्क्रीमच्या कारखान्यांवर आणि दुकानांवरही प्रशासनाने नजर ठेवली होती. या कारवाई दरम्यान १,९७,२०० रुपये किमतीचे ९८६ लीटर आईस्क्रीम जप्त करण्यात आले आहे. हे आईस्क्रीम देखील प्रमाणित मानकांप्रमाणे तयार करण्यात आले नसल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थांवर धाडी
प्रशासनाने केवळ भेसळयुक्त पदार्थांवरच नाही, तर शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला विक्री करणाऱ्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा विक्री करणारी १८ दुकाने सील करण्यात आली असून यात २ लाख १० हजार ५७१ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी १९ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्यावरील कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यासाठी पथके नियुक्त करून ठिकठिकाणी कारवाया सुरू आहेत. वसई-विरार महापालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अन्नभेसळ किंवा प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्यास कडक पावले उचलली जातील. ही मोहीम अशीच पुढेही सुरू राहील.”– व्यंकटेश चव्हाण, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन पालघर
