वसई: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई अधिक तीव्र केली आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याआदेशांनुसार एफडीएच्या पालघर परिमंडळ-०२ च्या पथकाने गुरुवारी वसईत एक धाड टाकली. या कारवाईदरम्यान खाद्यतेलाची साठवणूक करण्यासाठी जुन्या व वापरलेल्या डब्यांचा बेकायदेशीर वापर केला जात असल्याचे उघडकीस आले असून, प्रशासनाने तब्बल ३ हजार ६०४ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेतील देवदल सागपाडा परिसरातील मौर्य कंपाऊंड (गाळा क्र. ६) येथे चालणाऱ्या ‘मे. सृष्टी ऑईल डेपो’ या ठिकाणी पथकाने गुरुवारी अचानक छापा टाकला. या पाहणीदरम्यान अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी आवश्यक असलेली प्रयोगशाळा तेथे कार्यान्वित नसल्याचे आढळून आले. तसेच साठवलेले तेल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. सर्वात गंभीर बाब म्हणजे, आरोग्यास अत्यंत घातक ठरेल अशा जुन्या आणि आधी वापरलेल्या डब्यांचा वापर खाद्यतेल साठवण्यासाठी व विक्रीसाठी केला जात होता. या छाप्यादरम्यान पथकाने घटनास्थळावरून ६.६४ लाख रुपये किमतीचे रिफाइंड पामोलिन आणि रिफाइंड राईस ब्रान तेल तातडीने जप्त केले.

​अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील कलम २३, २६ आणि २७ चे हे थेट आणि गंभीर उल्लंघन असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व्यंकटेश चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर वसई-विरार शहरात एफडीएची पथके पूर्णपणे सक्रिय झाली असून गुटखा विक्रेते, पानटपऱ्या, उपहारगृहे, रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड आणि खाद्यतेल विक्रेत्यांवर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्या अशा अन्न व्यावसायिकांवर यापुढेही कठोर व दंडात्मक कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

यापूर्वी सुध्दा खाद्यतेलाचा साठा जप्त

यापूर्वी महापालिका कार्यक्षेत्रातील ३ वेगवेगळ्या आस्थापनांवर (दुकानांवर) छापे टाकण्यात आले. यावेळी तब्बल ४,७९८ किलो ९ लाख ९४ हजार ६९८ रुपये किंमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले होते हे खाद्यतेल आरोग्यास घातक असलेल्या जुन्या आणि पुनर्वापर केलेल्या डब्यांमध्ये भरण्यात आले असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले होते.