वसई: श्रावण महिन्यात तुंगारेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. श्रावण महिना सुरु होण्यास अवघा आठवडा शिल्लक असल्यामुळे खडी टाकून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक रहिवासी आणि भाविकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
वसई पूर्वेतून तुंगारेश्वर मंदिर, मुंबई-अहमदाबाद मार्ग अशा महत्त्वाच्या ठिकांणा जोडणारा तुंगारेश्वर रस्ता गेला आहे. मात्र, जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे मोरया नाका ते तुंगारेश्वर मंदिरापर्यंतच्या मार्गाची दुरावस्था झाली असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली होती.
पावसामुळे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यात साचणारा चिखल यामुळे रिक्षाचालक, कारचालक तसेच दुचाकी आणि सायकलवरून प्रवास करणाऱ्या मजुरांना या खड्ड्यांचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत होते. तसेच वसई पूर्वेतील तुंगारेश्वर मंदिर हे शिवभक्तांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. महामार्गापासून जवळ आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.
तर श्रावण महिन्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिकच वाढते. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी श्रावण महिना सुरू होण्याआधी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर तुंगारेश्वर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये खडी भरून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक रहिवासी, औद्योगिक वसाहतीतील कामगार आणि तुंगारेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
