वसई– वसईतून अपहरण झालेल्या ३ वर्षांच्या चिमुकल्याची वालीव पोलिसांनी अवघ्या ४ तासात वेगाने तपास करून सुखरूप सुटका केली आहे. प्रेमसंबंधात चिमुकल्याच्या पालकांचा अडथळा येत असल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी एका तरूणीने हे अपहरण केले होते. ही तरुणी टिव्ही मालिकेत अभिनेत्री म्हणून काम करते.
वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे दिनेश गौतम (३४) हा पत्नी प्रिती आणि ३ मुलांसह रहात होता. शनिवारी नेहमीप्रमाणे गौतम यांचा ३ वर्षांचा मुलगा प्रिन्स शाळेत गेला होता. त्यावेळी एक तरुणी शाळेत आली. प्रिन्सला औषध द्यायचे आहे आणि त्याला आईने घरी बोलावले असल्याची थाप तिने मारली. ही तरुणी प्रिन्सला शाळेतून घेऊन फरार झाली. काही वेळेतच हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >>> वसई विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस शिवसेनेत वाद; शिवसेना पदाधिकार्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा
…असा लावला शोध
घटनेचे गांभिर्य ओळखून वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकण शाखेच्या पथकाने आरोपी तरुणीचा शोध सुरू केला. शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यावेळी साबरीन शेख (२२) ही महिला मुलाला घेऊन जाताना दिसली. पोलीस प्रत्येक स्थानकातील सीसीसीटीव्हीचा माग काढत होते. तेव्हा ती वांद्रे येथे दिसून आली. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने अपहरणाची कबुली दिली. प्रिन्सला तिने नायगाव येथील एका नातेवाईकाकडे ठेवले होते. पोलिसांनी त्याची सुखरूप सुटका करून त्याला पालकांच्या स्वाधीन केले.
हेही वाचा >>> गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू
‘क्राईम पेट्रोल’मधील पोलीस प्रत्यक्षात चोर
आरोपी सबरीन शेख ही विविध मालिकांमध्ये काम करते. प्रसिध्द क्राईम पेट्रोल या मालिकेत तिने पोलिसाची भूमिका केली आहे. तिचे बृजेश गौतम या तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र बृजेशचा भाऊ गौतम यांचा या प्रेमसंबंधास विरोध होता. त्यामुळे बृजेश सबरीन पासून दुरावला होता. त्यासाठी गौतम आणि त्याच्या पत्नीला धडा शिकविण्यासाठी सबरीनने त्यांच्या मुलाचे अपहरण केले होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, राणे, कुंभार, ठोंबरे, शेख,. सचिन दोरकर, किरण म्हात्रे, सतीश गांगुर्डे, विशाल निंबाळकर, बाळू कुटे, मनोज मोरे, विनायक राऊत, सचिन लांडगे, केतन गोडसे, महिला पोलीस शिपाई दिपाली मासाळ, ममता पाटील आदींच्या पथकाने जलद कारवाई करून मुलाची सुटका केली.