scorecardresearch

वसईच्या रस्त्यावर दररोज दोनशे वाहनांची भर, वसईकरांची वाहन खरेदी वाढली

वसई विरार मध्ये नवीन वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मागील दहा महिन्यात शहरात ६१ हजार वाहने खरेदी करण्यात आली आहेत. 

vv traffic

कल्पेश भोईर

वसई : वसई विरार मध्ये नवीन वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मागील दहा महिन्यात शहरात ६१ हजार वाहने खरेदी करण्यात आली आहेत. त्यामुळे दररोज शहरात सरासरी दोनशेहून अधिक वाहने ही रस्त्यावर येऊ लागली आहेत. अपुरे रस्ते आणि त्यात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढली आहे

शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. मुंबईसह इतर ठिकाणचे  नागरिकही आता वसई विरार मध्ये घरे घेऊन राहण्यास आले आहेत. त्यामुळे लोकसंख्ये सोबतच वाहनांची गर्दी ही प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे.  सुरवातीला सणांचे औचित्य साधून वाहन खरेदीकडे अधिक ओढा होता.  मात्र दुचाकी,चारचाकी ही वाहने सध्या एकप्रकारे नागरिकांची गरज बनू लागली आहे. त्यामुळे  इतर दिवशीही वाहने खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

वसई विरार शहरात २०२१-२२ मध्ये ५५  हजार ८७६ वाहने खरेदी करण्यात आली होती तर २०२२-२३ या यावर्षांत अवघ्या दहा महिन्यातच ६१ हजार ८० वाहने खरेदी करण्यात आली असल्याची नोंद वसईच्या उपप्रादेशिक परिवहन विभागात करण्यात आली आहे. यामध्ये दुचाकी, ऑटोरिक्षा, चारचाकी, टेम्पो, ट्रक, रुग्णवाहिका, बस व इतर अशा वाहनांचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ५ हजार २०४ ने वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरात दिवसाला सरासरी २०३ ते २०४ वाहने रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महसूल वाढीलाही यातून चालना मिळू लागली आहे.

वाहने उभी करायची कुठे?

वसई विरार शहरात वाहने उभी करण्यासाठी पालिकेकडून जागा उपलब्ध करून दिली जाणार होती. मात्र अजूनही कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे वाहने उभी करण्यास नागरिकांना अडचणी निर्माण होत असतात. अनेकदा रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. त्यामुळे वाहने उभी करायची कुठे ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

वाहन खरेदी आकडेवारी

वर्ष                      वाहन संख्या

२०२०-२१     –       ५४ हजार ४९७

२०२१-२२   –         ५५ हजार ८७६

२०२२- २३  –          ६१ हजार ८०

(जानेवारी पर्यंत)

वाहतूक कोंडीत भर

शहरातील रस्त्यांचे नियोजनाचा अभाव यामुळे  वाहतूक व्यवस्थाही दिवसेंदिवस अधिक बिकट बनू  लागली आहे.शहरातील मुख्यरस्त्यासह अनेक ठिकाणच्या रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमणे यामुळे अरुंद रस्ते, अस्ताव्यस्त अवस्थेत मध्येच उभी करण्यात येत असलेली वाहने यामुळे वाहतूक समस्येत भर पडू लागली आहे.

सध्या वाहने ही एकप्रकारे नागरिकांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे परिवहन विभागात नोंदणीसाठी येणाऱ्या वाहनांची संख्येत वाढ होत आहे. 

– प्रविण बागडे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  वसई

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 00:35 IST
ताज्या बातम्या