यंदाच्या वर्षात विविध प्रकारच्या दुर्घटना शहरात घडल्या आहेत. यात प्रामुख्याने इमारत दुर्घटना, क्लोरिन वायू गळती, सुरक्षा जाळ्या अभावी तलावात पडून झालेले मृत्यू, रोहित्राचा स्फोट अशा घटनांचा समावेश आहे. या घडलेल्या सर्व घटना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच घडल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातत्याने घडणाऱ्या दुर्घटनांमधून कोणताच बोध घेतला जात नसल्याने प्रशासकीय व्यवस्थेची हीच निष्काळजी आता सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.
मुंबई उपनगराला लागूनच असलेले वसई विरार शहर हे मागील काही वर्षांपासून गजबजू लागले आहे. शहराचे नागरीकरणही झपाट्याने वाढू लागले आहे. पण, वाढत्या नागरिकरणामुळे शहराचे नियोजन करणे कठीण होऊ बसले आहे. गेल्या वर्षभरात वसई विरार महापालिका, महावितरण, एमएमआरडीए अशा विविध प्रशासकीय संस्थांच्या निष्काळजीपणामुळे एका मागून एक भीषण घटना घडल्याचे दिसून आले. पण त्यानंतरही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. अनेकदा एखादी दुर्दैवी घटना घडते आणि मग प्रशासन खडबडून जागे होते. लोकांना वाचवण्यासाठी धडपड सुरू होते, दुर्घटनेत दगावलेल्यांच्या नातेवाईकांना मदत जाहीर होते, विविध पक्षांचे राज्यस्तरीय नेते अधिकाऱ्यांची कानउघडणी करतात आणि सरतेशेवटी असा निष्काळजी पुन्हा होणार नाही याची ग्वाही दिली जाते. मात्र त्या दृष्टीने वाटचालच होत नसल्याने अडचणी कायम आहेत.
यंदाच्या वर्षात या अनुक्रमाची पुनरावृत्ती अनेकदा होताना दिसली आहे. याची सुरुवात झाली ती वसई विरारमधील अनधिकृत बांधकामांकडे झालेल्या दुर्लक्षाच्या घटनेपासून. शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत आणि या बांधकामांवर वेळीच लक्ष न दिल्याने अनेकजण निष्क्रिय व्यवस्थेचे बळी ठरले आहेत. तीन महिन्यांपूर्वी विरार पूर्वेच्या विजयनगर येथे रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत कोसळली. यात १७ निष्पाप नागरिकांचा जीव गेला. तर ९ जण जखमी झाले होते. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले होते. महापालिका प्रशासनाने वेळीच इमारतीकडे लक्ष दिले असते तर ही दुर्घटना टळली असती. या घटनेच्या तपासात पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्याला अटक केली, ज्यामुळे प्रशासनाचा बेफिकीरपणाचा चेहरा उघड झाला.
इमारत दुर्घटना ताजी असतानाच शहरात आणखीन एक मोठी घटना घडली. ती म्हणजेच क्लोरिन वायूची गळतीची. २५ नोव्हेंबरला सायंकाळी ४ च्या सुमारास वसई पश्चिमेच्या दिवाणमान जलकुंभाखाली ठेवण्यात आलेल्या क्लोरिन सिलेंडरला गळती सुरू झाली. या वायू गळतीमुळे १९ नागरिक बाधित झाले. तर त्यात एकाचा मृत्यू झाला. विशेषतः विषारी वायुगळतीस कारणीभूत ठरलेला क्लोरिनचा सिलेंडर दहा ते पंधरा वर्षांपासून पालिकेच्या जलकुंभाखाली पडून आहे.
नगरपरिषदेच्या काळात उसगाव धरणातून शहरात पुरवठा होत असलेल्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी या सिलेंडरमधील क्लोरिनचा वापर केला जात होता. मात्र, महापालिकेच्या स्थापनेनंतर जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाण्याचा पुरवठा वसई विरारमध्ये होऊ लागला आणि त्यामुळे क्लोरिनचा हा सिलेंडर वापराविनाच जलकुंभाखाली पडून होता. इतक्या वर्षात पालिकेने हा सिलेंडर हटविणे आवश्यक असताना, तसे न झाल्याने पालिकेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापालिका नागरिकांना नागरी सुविधा पुरवित असताना नागरी सुरक्षेला प्राधान्य देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने आजही सुरक्षेच्या अभावामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
महापालिकेने ठिकठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना फेरफटका मारता यावा या दृष्टीने तलाव विकसित केले आहेत. त्याचा नागरिकांना चांगला फायदाही होतो. पण, या ठिकाणांची देखभाल दुरूस्ती न झाल्यामुळे विरंगुळ्याची ही ठिकाणे आता नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागली आहेत. तलावाच्या सभोवताली लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळ्या सुस्थितीत आहेत किंवा नाही याकडे दुर्लक्ष झाल्याने यंदाच्या वर्षात दोन जणांना आपला गमवावा लागला आहे. यात ७० वर्षीय दृष्टीहीन नागरिकाचा व ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे. या घटनेनंतर तलाव सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तलाव विकसित केली जात असताना दुसरीकडे त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली जाते. जीर्ण झालेल्या जाळ्या, तुटलेली खेळणी, यासह अन्य साहित्य ज्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल या आधीच दुरुस्त किंवा बाजूला केले जात नसल्याने अपघातासारख्या घटना समोर येत आहेत. मग, त्या ठिकाणी नियुक्त केलेले कर्मचारी व अधिकारी नेमके करतात काय? असा प्रश्न निर्माण होतो.
महापालिकेनंतर जर शहरात नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना कोणामुळे घडत असतील. तर त्या म्हणजे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे. गेल्या काही काळात लोंबकळत्या वीजतारा, उघड्या वीजपेट्या, जुनी झालेली रोहित्र आणि मुख्यत्वे रखडलेले विद्युत लेखा परीक्षण यामुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. चालू वर्षात नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर शहरात विविध ठिकाणी रोहित्रांना सुरक्षा जाळा बसवण्याचे तसेच नवी रोहित्र बसवण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतर नालासोपारा पूर्वेच्या धानिव परिसरातील सागर इस्टेटमधील एका बंद गाळ्यात रोहित्र बसविले असल्याचा प्रकार समोर आला होता. ज्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कल्पनाही नव्हती. यावरून महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला. शहरात सातत्याने घडत असलेल्या निष्काळजीपणाच्या घटना या सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या नाहीत. अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाला आता तरी जागे होऊन विविध उपाययोजनांचा अवलंब करावा लागेल तरच अशा दुर्घटनांना रोखणे शक्य होणार आहे.
