वसई: चाळ बिल्डर समय चौहान हत्या प्रकरणानंतर गुन्हेगारांचे संघटन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. या गुन्ह्यातील आरोपी गुंडावर मोक्का लावण्याची तयारी सुरू केली असून दुसरीकडे त्यांची अनधिकृत बांधकामे पालिकेच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात येत आहे.
विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्येनंतर शहरात भूमाफियांचे गुन्हेगारीचे जाळे समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील गॅंगस्टर सुभाषसिंग ठाकूर याच्या नावाने शहरात गुन्हेगारी फोफावली होती. अनेक चाळ बिल्डर अनधिकृत इमारती आणि चाळी बांधून आपले गुन्हेगारीचे साम्राज्य पसरवत होते. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढण्याबरोबरच त्यांचे अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिले होते. त्यानुसार समय चौहान प्रकरणातील अटक आरोपींची बांधकामे तोडण्याचे पत्र पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. महेश पाटील यांनी दिले होते.
पोलिसांच्या या पत्राची दखल घेऊन पालिकेने शोध मोहीम हाती घेतली आणि या भूमाफियांच्या बांधकामांवर कारवाई सुरू केली. आतापर्यंत पालिकेने विरार पूर्वेच्या फुलपाडा आणि सहकार नगरमधील ५ इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. त्यात झा निवास रहिवाशी सेवा संघाची इमारत, साई शांती अपार्टमेट, मथुरा अपार्टमेंट, द्वारकार अपार्टमेट ब्रेकर आणि गॅस कटरच्या साहाय्याने तोडून जमीनदोस्त केल्या आहेत. याशिवाय गांधी चौक येथील चाळीचे बांधकाम तोडले आहे, अशी माहिती पालिकेच्या प्रभाग समिती ‘सी’ चे प्रभारी साहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांनी दिली.
हे भूमाफिया अनधिकृत इमारती आणि चाळींच्या माध्यमातून आर्थिक साम्राज्य उभे करत होते. त्यासाठी ते गुंडगिरीच्या मार्गाचा वापर करत होते. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबरोबर अनधिकृत बांधकामे तोडण्याचे पत्र पालिकेला दिले आहे.-डॉ. महेश पाटील, उपायुक्त (गुन्हे) मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय
आम्ही सातत्याने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहोत. पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार भूमाफियांची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करत आहोत. ही कारवाई यापुढे देखील सुरू राहणार आहे.-आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई विरार महापालिका