वसई: अनधिकृत बांधकाम, खाजगी आणि सरकारी जगावर केले जाणारे अतिक्रमण यांच्याशी संबंधित विविध प्रकरणे वसई विरार शहरात चर्चेचा विषय ठरत असताना. वसईतील एका पोलीस ठाण्याच्या इमारतीत पोलीस व तक्रारदारांसाठी राखीव असणाऱ्या जागेत चक्क एकजण अनधिकृतरीत्या उपहारगृह चालवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने आणि परवानगीने हे उपहारगृह सुरू असल्याचा दावा त्याच पोलीस ठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.

वसई पश्चिमेला माणिकपूर पोलीस ठाणे आहे. विविध कारणांमुळे माणिकपूर पोलीस ठाणे चर्चेचा विषय ठरत असते. पण, मंगळवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आणि ह्युमन राईट संरक्षण संस्था पालघर अध्यक्ष महेश गोसावी यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात मागील २ वर्षांपासून अण्णा टी स्टॉल नावाने एक अनधिकृत उपहारगृह सुरू असल्याचा आरोप केला आहे. पोलीस ठाणे ही सरकारी जागा असून माणिकपूर पोलिसांच्या सहकार्याने हे बेकायदेशीरपणे हे उपहारगृह सुरू करण्यात आले असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

अतिक्रमणाबाबत बोलताना ते म्हणाले, १९९२-९३ साली माणिकपूर पोलीस ठाण्याच्या जागेचा शोध सुरू होता. त्यावेळी आता ज्या जागेवर पोलीस ठाणे आहे तिथे डंपिंग ग्राऊंड होते. आम्ही ती जागा साफ करून घेतली आणि तेव्हापासून या जागेवर पोलीस ठाणे व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. जागा ताब्यात आल्यानंतर या जागेवर सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत माणिकपूर पोलीस ठाण्याची इमारत उभी राहिली आहे. या इमारतीत पोलीस आणि अभ्यागतांच्या विश्रांतीसाठी एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला होता. मात्र दोन वर्षापासून तो कक्ष बंद करून तेथे बेकायदेशीररित्या अण्णा टी स्टॉल सुरू करण्यात आला आहे.

विजय शेणॉय हा व्यक्ती अण्णा म्हणून प्रसिध्द आहे. त्याची पोलिसांमध्ये चांगली ओळख आहे. त्याच्यावर खास मेहरबानी म्हणून ही जागा त्याला आंदण देण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

तसेच पोलीस ठाण्याची जागा अपुरी असताना हे पोलिसांच्या कक्षाची जागा व्यावसायिक वापरासाठी का दिली आणि जर द्यायची असेल तर रितसर निविदा काढून विधव पोलीस पत्नी, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी माफक दरात राखीव ठेवता आली असती. वसई ठाण्यात उपहारगृहाला जागा विनामूल्य का देण्यात आली? त्याच्या बुडालेल्या महसूलासाठी जबाबदार कोण? असे प्रश्नही गोसावी यांनी उपस्थित केले आहेत. तसेच हे बेकायदेशीर उपहारगृह बंद करून पोलिसांची जागा मोकळी करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

उपहारगृह चालकाचे म्हणणे काय?

मणिपूर पोलीस ठाण्यातील कथित अनधिकृत उपहारगृह चालवणाऱ्या विजय शेणॉय उर्फ अण्णा यांचीही प्रतिक्रिया आता समोर आली आहे. यावेळी ते म्हणाले की, काही पोलीस अधिकारांच्या मदतीने हे उपहारगृह सुरू करण्यात आले आहे. कोणत्याही करारनाम्याशिवाय तसेच भाडे अदा न करता हे उपहारगृह मी चालवतो. तसेच माणिकपूर पोलिसांनी दिलेल्या एनओसीच्याआधारे मला वीज जोडणी मिळाली आहे.