विरार : वसई -विरारमध्ये अनधिकृत टपऱ्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. आजतागयत ३९८ अनधिकृत टपऱ्या उभारण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे.
वसई-विरारमध्ये वाढत्या टपऱ्या प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. करोनानंतर शहरातील मुख्य रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात टपऱ्या वाढू लागल्या. टपऱ्याधारकांनी बेकायदा रस्त्यावर अतिक्रमण करून आपली दुकाने थाटल्याने त्यावर होणारी लोकांची गर्दी यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यात पदपथावर मोठय़ा प्रमाणात टपऱ्यांचे अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना चालायला जागासुद्धा शिल्लक राहिली नाही. यामुळे पालिकेने या सर्व बेकायदा टपऱ्यांवर कारवाई करण्याचे ठरविले होते. त्यानुसार सर्व प्रभाग समिती कार्यालयाला आयुक्तांनी आदेश देऊन सर्व भागांतील बेकायदा टपऱ्यांवर कारवाईचे करण्यास सांगितले होते.
पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सी प्रभागात १५७ सर्वाधिक तर प्रभाग समिती बीमध्ये १०५ आणि प्रभाग समिती एचमध्ये सर्वात कमी ११ टपऱ्या आहेत. सर्व प्रभागातील टपऱ्यांवर नोटीस चिकटवून टपरीधारकांना सूचित करण्यात आले असून त्यानुसार कारवाईस सुरुवात झाली आहे. प्रभाग इ मध्ये १०, तर एफ ३ आणि जी मध्ये ३ टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत.
सर्व प्रभाग समिती कार्यालयांना टपऱ्या, फेरीवाले, बेवारस वाहने यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच काही ठिकाणी कारवाईसुद्धा सुरू झाली आहे. लवकरच सर्व बेकायदा टपऱ्या हटविल्या जातील. प्रामुख्याने कायमस्वरूपी बंद असलेल्या टपऱ्या काढण्याचे काम सुरू केले आहे. -आशीष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका