वसई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरारमधील अर्नाळा येथील स्मारक परिसरातील पिंपळ आणि वडाच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे माजी अध्यक्ष समीर वर्तक यांनी या अनधिकृत वृक्षतोडीबाबत अर्नाळा ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कार्यालयात तक्रार केली आहे.

८ फेब्रुवारी १९४८ रोजी अर्नाळा येथील संगमाच्या ठिकाणी विधीपूर्वक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे २ ऑक्टोबर १९५६ रोजी शासनाच्यावतीने अर्नाळा गांधी स्मारक स्तंभ उभारण्यात आला होता. ३० जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे माजी अध्यक्ष समीर वर्तक, संकेत वसईकर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेले असताना स्मारकाच्या आवारातील पिंपळ आणि वडाच्या झाडाची कोणीतरी अधिकृतपणे कत्तल केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबत वर्तक यांनी अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व सरपंचांकडे तक्रार विचारणा केली. पण याबाबत काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वसईचे तहसीलदार, तसेच वसई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन वृक्षांची अमानुष कत्तल करणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी समीर वर्तक यांनी केली आहे.

वृक्षांच्या कत्तलीपासून अधिकारी अनभिज्ञच

२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त जेव्हा आम्ही स्मारकाला अभिवादन करायला गेलेलो तेव्हा ही  दोन्ही झाडं जागच्या जागी होती. त्यांची वाढही खूप छान झाली होती. मात्र, त्यानंतर दोन महिन्यांनी जेव्हा मी या स्मारकाला भेट दिली तेव्हा कोणीतरी या झाडांची कत्तल केल्याचे दिसून आले आहे. याबाबत संबंधित अधिकारी, गावचे सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांना काहीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याबाबत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया समीर वर्तक यांनी दिली आहे.