वसई :- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा परिसरात रविवारी एका ४५ ते ५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिळून आला आहे. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
विरार पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील एका नाल्यात रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह दिसून आला होता. या घटनेची माहिती तातडीने येथील नागरिकांनी मांडवी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
मृतक इसमाची दाढी पांढरी असून त्याचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे आहे. या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. संबंधित व्यक्तीचा एखाद्या वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे की यामागे काही घातपात आहे याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मृतदेह आढळण्याचे सत्र
गेल्या काही दिवसांपासून विरार पूर्व आणि महामार्ग परिसरात मृतदेह आढळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. १३ दिवसांपूर्वी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरवली येथे एका महिलेचा मृतदेह आढळला होता. त्यापाठोपाठ ६ दिवसांपूर्वी पेल्हार येथेही शिर नसलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. दोन्ही प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. आता या ताज्या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर आहे.
