scorecardresearch

मुलाच्या त्या ‘अपहरणनाट्या’चा उलगडा; बेपत्ता चिमुकला आईच्या कुशित सुरक्षित विसावला

नालासोपारा रेल्वे स्थानकातून एका चिमुकल्याचे अपहरण केले जात असल्याचे सीसीटीव्ही चित्रण समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.

मुलाच्या त्या ‘अपहरणनाट्या’चा उलगडा; बेपत्ता चिमुकला आईच्या कुशित सुरक्षित विसावला
संग्रहित छायाचित्र

वसई-  नालासोपारा रेल्वे स्थानकातून एका चिमुकल्याचे अपहरण केले जात असल्याचे सीसीटीव्ही चित्रण समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. रेल्वे पोलिसांकडून संशियत अपहरणकर्त्या जोडप्याचा शोध सुरू होता. मात्र दुसर्‍या दिवशी तुळींज पोलिसांनी या जोडप्याचा शोध घेऊन मुलाची सुखरूप सुटका केली. या जोडप्याने मुलाचे अपहरण केले नव्हते तर वाट चुकलेल्या मुलाला काळजीपोटी घरी आणले होते अशी माहिती समोर आली आहे.

भाईंदरच्या उत्तन येथे राहणारी एक कामगार महिला आपल्या दोन लहान मुलासंह गुरूवारी दुपारी वसई येथे कामासाठी आली होती. दुपारी ती कडेवरील मुलाला घेऊन पाणपोईवर पाणी पित असताना तिचा साडेतीन वर्षांचा मुलगा अरूण हा बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याच्या आईने रात्री वसई रेल्वे स्थानकात तक्रार दिली होती. वसई पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलीस सर्व रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासत असातना नालासोपारा येथील फलावाटवर एक जोडपे या मुलाला घेऊन जात असताना दिले. त्याचे अपहरण झाल्याचे समज झाल्याने या अपहणकर्त्या जोडप्यांचा शोध सुरू झाला..दरम्यान शुक्रवारी तुळींज पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विजय नगर येथून या जोडप्याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली. आम्हाला माहिती मिळताच आम्ही त्या मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. त्या जोडप्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.

…अपहरण केले नसल्याचा दावा

प्रथमदर्शनी हा अपहऱणाचा प्रकार वाटत नसल्याचा दावा वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी केला. हा चिमुकला वसई स्थानकातून एकटा विरारला जाणार्‍या लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यात शिरला होता. तो नालासोपारा येथे उतरून एकटाच फिरत होता. त्यामुळे या जोडप्याने त्याला काळजीपोटी घरी नेले. त्याला अंघोळ करून नवीन कपडे दिले. आम्ही या मुलाला पोलिसांकडे देणारच होतो असा दावाही या जोडप्याने केल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही या जोडप्याच्या दाव्यांची सत्यता तपासत आहोत असेही इंगवले यांनी सांगितले. दरम्यान, हा चिमुकला त्याच्या आईकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unraveling kidnapping drama child missing toddler rests safely mother arms ysh

ताज्या बातम्या