scorecardresearch

रात्रीच्या वेळी बेशिस्त रिक्षाचालकांचा वावर!

मीरा-भाईंदर शहरात रात्रीच्या सुमारास बेशिस्त रिक्षाचालकांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

चालक गणवेश न घालता दमदाटी करून अधिक पैसे घेत असल्याचा आरोप

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात रात्रीच्या सुमारास बेशिस्त रिक्षाचालकांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चिंताजनक बाब म्हणजे रिक्षाचालक नियमानुसार आवश्यक गणवेश घालत नसून वर दमदाटी करत अधिक पैसे घेत असल्याने त्यांच्यावर संशय निर्माण होत असल्याचे आरोप प्रवाशांकडून  करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात नागरिक दळवळण करण्याकरिता मोठय़ा प्रमाणात रिक्षाचा वापर करतात. यात मीरा रोड येथे मीटरच्या आधारे वाहतूक करण्यात येत असून भाईंदरला ठरवण्यात आलेल्या शेअरह्ण पद्धतीने वाहतूक केली जाते. सद्यस्थितीत शहरात एकूण १५ हजार ५०० रिक्षा अधिकृत आहेत. या रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवण्याकरिता वाहतूक पोलिसांकडून सुरक्षा कार्डह्ण योजना राबवून प्रत्येक चालकाला ओळखपत्र दिले आहे. करोना काळानंतर रिक्षा भाडय़ात करण्यात आलेली मोठी दर वाढ सातत्याने चालक आणि प्रवाशांच्या वादास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे हा वाद कमी करण्याकरिता वाहतूक विभागाकडून जनजागृती करून चौकाचौकांत वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.  मात्र हे कर्मचारी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंतच असल्याने या नंतर शहरात मोठय़ा प्रमाणात बेशिस्त रिक्षाचालकांचा वावर आढळून येत आहे.

हे रिक्षाचालक गणवेश न घालता भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर सर्रास व्यवसाय करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रिक्षात दोन प्रवासी बसल्यास करोना नियमानुसार अधिक भाडे व तीन प्रवासी बसल्यास पूर्वीप्रमाणे मुळ भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली असताना हे चालक दमदाटी करत तीन प्रवासी बसवून करोना नियमानुसार अधिक भाडे घेत आहेत. यातील अनेक रिक्षाचालक हे अत्यंत तरुण असून ते अमली पदार्थाचे सेवन करत रिक्षा चालवत असल्याची भीती असल्यामुळे नागरिक वाद घालण्यास घाबरत आहेत. तर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला असून वाहतूक विभागाने रात्रीच्या सुमारास देखील पोलीस तैनात करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांना तक्रार करण्यास अडचणी

मीरा-भाईंदर शहरात व्यवसाय करत असलेल्या बेशिस्त रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवण्याकरिता वाहतूक विभागाकडून रिक्षाचालकांना ओळखपत्र देण्यात येत आहे. हे ओळखपत्र रिक्षामध्ये लावणे बंधनकारक असून रिक्षा चालकाची संपूर्ण माहिती त्यात देण्यात आली आहे. त्यामुळे एखादा गैरप्रकार घडल्यास अशा चालकाची तक्रार पोलिसांना करणे नागरिकांना शक्य  होते. मात्र रात्रीच्या सुमारास व्यवसाय करणाऱ्या अनेक रिक्षाचालकांकडे हे ओळखपत्र नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा चालकांची तक्रार कशी करावी असा प्रश्न त्रस्त प्रवाशांना पडला आहे.

रात्रीच्या सुमारास वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी याकरिता दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार कारवाई देखील होत आहे. मात्र रात्रीच्या वेळेस गणवेश आणि ओळखपत्र न बाळगलेल्या रिक्षाचालकांवर विशेष कारवाईची मोहीम राबवली जाणार आहे.

– रमेश भामे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unruly rickshaw pullers night ysh

ताज्या बातम्या