सुहास बिऱ्हाडे
रेल्वेमधील वाढत्या गुन्हेगारीबरोबर रेल्वे स्थानक परिसरातील गुन्हेगारीदेखील वाढत आहे. वसई-विरार शहरात नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे रेल्वे परिसरातील सुरक्षा किती तकलादू आहे हे समोर आले आहे. त्यामुळे रेल्वे परिसर सर्वसामान्य प्रवाशांसाठी विशेषत: महिलांसाठी असुरक्षित बनला आहे
मागील दहा दिवसांत वसई-विरार शहरातील रेल्वे स्थानक परिसरात घडेलल्या दोन घटना या रेल्वे परिसराच्या सुरक्षेला तडा देणाऱ्या आहेत. रात्री अकरा वाजता एका १३ वर्षीय मुलीचे वसई स्थानकातून अपहरण करून बलात्कार करण्यात आला. तर दुसऱ्या घटनेत विरार रेल्वे स्थानकाच्या फलाटावरच मध्यरात्री प्रवाशावर हल्ला करून लुटण्यात आले. रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था किती तकलादू आहे आणि प्रवासी किती असुरक्षित आहे ते दाखविणाऱ्या या दोन घटना बोलक्या आहेत.
नालासोपारामध्ये राहणारी एक १३ वर्षांची मुलगी रागावून घर सोडून मुंबईला गेली होती. दिवसभर मुंबईत फिरली आणि राग शांत झाल्यानंतर ती लोकल पकडून घरी यायला निघाली. पण माहिती नसल्याने रात्री ११ वाजता नालासोपाराऐवजी चुकून वसई स्थानकात उतरली. भेदरलेल्या अवस्थेत ती या परिसरात फिरत होती. त्या ठिकाणी वारांगना उभ्या असतात. या वेश्यांकडे ग्राहक म्हणून आलेल्या एका व्यक्तीची नजर या मुलीवर पडली. त्याच्यातील सैतान जागा झाला. त्याने मुलीची चौकशी केली आणि तिच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेत तिला फूस लावून आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तो आला होता वेश्येला घरी नेण्यासाठी पण त्याच्या तावडीत एक कोवळी मुलगी आयतीच सापडली. त्याला पोलिसांनी नंतर अटक केली. त्याला न्यायालयातून शिक्षा होईलच, पण हा दोष रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था न ठेवू शकणाऱ्या पोलीस यंत्रणेचासुद्धा आहे. रात्री ११ ही शहरासारख्या ठिकाणी फार उशिराची वेळ नाही. तरी या परिसरात पोलीस नव्हते. पोलीस असते तर त्या मुलीची चौकशी करून तिला सुखरूप घरी सोडले असते. इथे पोलीस नसतात. ज्या असतात त्या वारांगना असतात. वारांगना हा सामाजिक विषय सोडला तर या वारांगनांच्या वावरामुळे या परिसरात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे, विकृत लोक फिरत असतात. त्यांचा फटका येथील सर्वसामान्य महिलांना बसतो. स्थानक परिसरातील वारांगनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
दुसरी घटना विरार स्थानकातील आहे. विरारमधील एक प्रवासी अंधेरीवरून शेवटची लोकल ट्रेन पकडून विरार स्थानकात उतरला. रात्रीचे अडीच वाजले होते. त्याच्या मागावर असणाऱ्या चौघांनी त्याला फलाट क्रमांक ३ वर असणाऱ्या स्वयंचलित सरकत्या जिन्यावर गाठले. त्याला मारहाण करून त्याच्याकडील मोबाइल, सोनसाखळी आदी ऐवज लुटून नेला. मध्यरात्री फलाटांवर पोलीस व्यवस्था पुरेशी नसते हे यानिमित्ताने दिसून आले आहे. शेवटची लोकल रात्री अडीच वाजता येते. तोपर्यंत मुंबईत कामानिमित्त गेलेले प्रवासी येत असतात. अशा वेळी रात्री स्थानकात, परिसरात पुरेसे पोलीस तैनात ठेवणे आवश्यक असते. तरीदेखील रेल्वे प्रशासन सुरक्षा व्यवस्था देऊ शकत नाही.
रेल्वे सुरक्षा व्यवस्था तकलादू असल्याचे इस्थर अनुया हा तरुणीच्या हत्या प्रकरणामुळे काही वर्षांपूर्वी समोर आले होते. ५ जानेवारी २०१४ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास इस्थर अनुया ही २३ वर्षांची तरुणी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात उतरली होती. त्यावेळी प्रवाशांचे सामान चोरी करण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती टॅक्सीचालक बनून थेट फलाटावर गेला. इस्थरला एकटी बघून त्याची नियत फिरली त्याने तिला आडमार्गावर नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. ही घटना संपूर्ण देशात गाजली होती. त्यानंतर पोलिसांना खडबडून जाग आली. रिक्षा आणि टॅक्सीचालकांना प्रवासी घेण्यासाठी फलाटावर येण्यास बंदी घालण्यात आली. रात्री १० नंतर रेल्वे स्थानकातून उतरून रिक्षा टॅक्सीत बसणाऱ्या सर्व महिला प्रवाशांची आणि टॅक्सीची नोंद पोलीस घेऊ लागले होते. यामुळे चालकांवर जरब बसला आणि महिला सुरक्षितपणे रात्रीच्या वेळी प्रवास करू लागल्या. पण आता ही पध्दत दिसून येत नाही. मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोटानंतर रेल्वे स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. रेल्वे स्थानकातील मार्गात धातू शोधक यंत्रण (मेटल डिटेक्टर) असलेले प्रवेशद्वार लावण्यात येणार होते. पण प्रमुख स्थानके वगळता कुठेच त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
गर्दीचा गैरफायदा घेत भुरटे चोर, गुन्हेगार सक्रिय असतात. विनयभंगाच्या घटना घडतात. रेल्वे स्थानकाची सुरक्षा रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची असते. पण रेल्वेस्थानक परिसर स्थानिक पोलिसांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे हद्दीचा वाद न घालता संयुक्तपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. रात्री विनाकारण टेहळणारे, नशेबाज आदींना थारा न देता परिसरातून हुसकावले पाहिजे. २४ तास गणवेशातील पोलीस, महिला पोलीस तैनात असणे आवश्यक आहे. गणवेशातील पोलीस दिसले तरी आळा बसतो. रेल्वे सुरक्षेतील सर्वाधिक खर्च हा मनुष्यबळावर खर्च कऱण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकात रिक्षाचालकांची मुजोरगिरी सुरू असते. त्यांचे टोळके उभे असतात. त्यांच्यामुळे रात्री उशिरा घरी येणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून यावे लागते. आज रेल्वे (लोहमार्ग) पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. प्रत्येक फलाटावर पोलीस बंदोबस्त ठेवता येईल एवढे मनुष्यबळ आवश्यक आहे. गुन्हा घडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपी पकडणे हे काम नसून गुन्हा घडू नये यासाठी भक्कम उपाययोजनांची आवश्यकता आहे.
रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमण मुक्त होणे गरजेचे
मुंबईच्या लोकल ट्रेन या शहराच्या जीवनवाहिन्या आहेत. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करत असतात. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर गर्दी असते, परंतु रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे ये-जा करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. एक जरी लोकल उशिरा आली किंवा रद्द झाली तर तुफान गर्दी वाढते. अशा वेळी पाय ठेवायलाही जागा नसते. रेल्वे स्थानक ही संवेदनशील जागा आहे. या ठिकाणी कुठल्याही क्षणी कुठलेही संकट ओढवू शकते. रेल्वे अपघात, घातपात, दंगली, आगी यासारख्या घटना कधीही घडू शकतात. त्यामुळे प्रवाशांना बाहेर सहज पडणे गरजेचे असते. अन्यथा चेंगराचेंगरीने बळी जाऊ शकतात. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीची घटना ताजी आहे. परंतु प्रवाशांना सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग आहेत का? सर्व रेल्वे स्थानकांच्या बाहेर फेरीवाले, विक्रेते, टपऱ्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यातून अनधिकृतपणे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे कुणी बोलत नाही. पण उद्या संकट आल्यावर प्रवाशांना बाहेर पडण्यास जागा मिळणार नाही आणि चेंगराचेंगरी होऊन नाहक बळी जातील. बरं स्थानकाबाहेर बेशिस्त रिक्षाचालक असतातच. त्यांच्यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. यामुळे भरडला जातो तो सर्वसामान्य प्रवासी. यामुळे रेल्वेची सुरक्षा वाढविण्याबरोबर रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमणमुक्त व्हायला हवेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unsafe railway premises crime vasai virar railway station amy
First published on: 24-05-2022 at 01:40 IST