भाईंदर : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एमडी या अमली पदार्थाची निर्मिती करणारा कारखाना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष-४ने उद्ध्वस्त केला. या कारवाईत आतापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली असून ६९ किलो ७५९ ग्रॅम एमडी, १८ लाख ७० हजार रुपयांची रोकड तसेच एमडी तयार करण्यासाठी लागणारे रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १३९ कोटी रुपये आहे.

२४ जून रोजी नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर परिसरात पोलिसांनी दोन तरुणांना ११२ ग्रॅम एमडीसह पकडले होते. या अमली पदार्थाची किंमत सुमारे ३ लाख ३६ हजार रुपये होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण कक्ष-४कडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान एमडी तयार करणारे तसेच त्याची विक्री करणारे अनेक जण पोलिसांच्या जाळ्यात सापडले. तपासात गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले. यातील काही आरोपी एमडी तयार करण्यासाठी लागणारी रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्य पुरवत होते.

पोलिसांनी तपास करताना प्रयागराज येथील एका शेतजमिनीवर भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये एमडी तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आणले. या ठिकाणी छापा टाकून ५२ किलो ९३२ ग्रॅम एमडी तसेच एमडी तयार करण्यासाठी वापरली जाणारी विविध रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्य जप्त करण्यात आले.

या कारवाईत एमडी तयार करण्यासाठी वापरले जाणारे मोनो मिथाइलअमाइन,हायड्रोक्लोरिक ऍसिड,क्लोरोफॉर्म यांसह सुमारे २६० लिटर रसायने जप्त करण्यात आली. तसेच फ्लास्क, हीटिंग मँटल, ड्रॉपिंग फनेल, थर्मामीटर आदी प्रयोगशाळेतील साहित्यही पोलिसांच्या हाती लागले.

तपासात मुंबई, नालासोपारा, कल्याण, नेरळ, जळगाव, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथे एमडीची विक्री करणारे आणि या व्यवहारात सहभागी असलेले आरोपी निष्पन्न झाले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी एमडी जप्त करण्यात आले. आतापर्यंत एकूण ६९ किलो ७५९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणातील आरोपींचे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या टोळीशी संबंध आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. एमडी तयार करणारे, त्यासाठी रसायने व साहित्य पुरविणारे, अमली पदार्थाची विक्री करणारे आणि आर्थिक व्यवहार करणारे अशा एकूण २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलिस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलिस आयुक्त गोंदूराम बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्ष-४च्या पथकाने केली.

यात गुन्हे प्रकटीकरण कक्ष-४चे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण भोसले, प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पोलिस उपनिरीक्षक उमेश भागवत तसेच पोलिस कर्मचारी मनोहर तावरे, योगेश देशमुख, संतोष मदने, शिवाजी पाटील, रवींद्र भालेराव, विजय गायकवाड, प्रवीणराज पवार, धनंजय चौधरी, हनुमंत सूर्यवंशी, समीर यादव, अश्विन पाटील, रवींद्र कांबळे, संदीप शेरमाळे, सचिन चौधरी आदींनी कारवाईत सहभाग घेतला. सायबर सेलचे संतोष चव्हाण आणि अमिना पठाण यांनीही तपासात सहकार्य केले.