भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका मार्फत उत्तन येथील समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४० टन प्लास्टिक व इतर प्रकारचा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने महापालिकेने उत्तन परिसरातील वेलंकनी आणि भाटेबंदर या समुद्र किनाऱ्यांवर महास्वच्छता अभियान आयोजित केले होते. या मोहिमेला स्थानिक नागरिकांचा तसेच स्वयंसेवी संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमात संत निरंकारी मिशन संस्थेचे स्वयंसेवक आणि महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी असे एकूण ७७५ जण सहभागी झाले होते. सकाळपासून सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेत किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक कचरा, थर्माकोल, बाटल्या, पिशव्या तसेच इतर घनकचरा गोळा करण्यात आला.मोहीम संपेपर्यंत जवळपास ४० टन कचरा जमा करण्यात यश आले. गोळा केलेल्या कचऱ्याचे पुढे योग्य प्रकारे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

तसेच नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे. नियमित अशा स्वच्छता मोहिमा राबवून शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा निर्धार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.