scorecardresearch

मोकळय़ा जागा ‘कर’विना: शासन निर्णयानंतरही वसई-विरार महापालिकेकडून कर आकारणी नाही; कोटय़वधींचे नुकसान

शहरातील मोकळय़ा जागेवर कर आकारणी करण्याचा शासन निर्णय असूनही वसई-विरार महापालिकेकडून कर आकारला जात नसल्याने दरवर्षी पालिकेचे कोटय़वधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

वसई: शहरातील मोकळय़ा जागेवर कर आकारणी करण्याचा शासन निर्णय असूनही वसई-विरार महापालिकेकडून कर आकारला जात नसल्याने दरवर्षी पालिकेचे कोटय़वधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
शहरातील मोकळय़ा जागेवर कर आकारणी करण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार शासननिर्णयदेखील काढण्यात आला होता. यानुसार सर्व महापालिकांमध्ये मोकळय़ा जागेवरील कर आकारणी करण्यात येत असते. मात्र वसई-विरार महापालिकेत अद्याप मोकळय़ा जागेवरील कर आकरणी करण्यात आलेली नाही. यामुळे दरवर्षी पालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत असते. २०१७ मध्ये मोकळय़ा जागेवरील कर आकारणी करण्याबाबत राज्य शासनाने अध्यादेश काढला होता. त्या अध्यादेशावर महासभेत चर्चादेखील झाली होती. परंतु हा कर लावण्यात आला नव्हता. सर्वच महापालिकांमध्ये मोकळय़ा जागेवरील कर आकारणी केली जात असते. लगतच्या मीरा-भाईंदर महापालिकेचे मोकळय़ा जागेवरील कर आकारणीचे वार्षिक अपेक्षित उत्पन्न ९६ कोटी रुपयांचे आहे. उत्पन्नाचे प्रमुख मार्ग असतानादेखील पालिका या कर आकारणीकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याशी संपर्क साधला असता मोकळय़ा जागेवरील कर आकारणी करण्याचा निर्णय हा धोरणात्मक आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीनंतर होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले
काय आहे मोकळय़ा जागेतील कर?
शहरात ज्या ज्या अकृषिक (एनए ) मोकळय़ा खासगी जागा असतात त्यावर हा कर आकारला जातो. या जागा विकासक आणि बिल्डरांच्या असतात. जोपर्यंत त्या जागेचा विकास होऊन भोगवटा प्रमाणपत्र दिले जात नाही, तोपर्यंत त्या मोकळय़ा जागेला हा कर आकारला जात असतो.
पालिकेचे उत्पन्न ३२१ कोटी
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांत पालिकेने ५२१ कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी पालिकेने मार्चअखेर पर्यंत एकूण ३२० कोटी ७६ लाख इतकी मालमत्ता कर वसूल केला आहे. यात ३०६.१९ कोटी हे मालमत्ता तर १४.५७ कोटी हे मोबाइल मनोरे याचा समावेश आहे. मागील वर्षी पालिकेने केवळ २२१ कोटी इतका मालमत्ता कर वसूल केला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात १०० कोटींची भर पडली आहे. जर पालिकेने मोकळय़ा जागेवर कर आकारला जर पालिकेच्या उत्पन्नात वार्षिक ५० कोटींची भर पडेल अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vacancies without tax vasaivirar municipal corporation does not levy tax even after ruling loss crores amy

ताज्या बातम्या