वसई: पश्चिम रेल्वे मार्गावरील वैतरणा रेल्वे स्थानकात मालगाडीच्या धडकेमुळे तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे स्थानकातील अपुरे पादचारी पूल, स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची पूर्वसूचना न मिळणे व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा अभाव अशा विविध असुविधांबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच प्रवाशांच्या अपघातास याच अपर्याप्त सुविधा कारणीभूत असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी वैतरणा रेल्वे स्थानकातून रुळ ओलांडून जात असताना मालगाडीच्या धडकेत गौरव पाटील (२५) या तरुणाचा मृत्य झाला होता. यानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी रेल्वे स्थानकातील अपुऱ्या सोयीसुविधा कशाप्रकारे प्रवाशांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहेत याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला आहे.

वैतरणा रेल्वे स्थानकात प्रवाशांना एका फलाटावरून दुसरीकडे जाण्यासाठी फक्त एकच पादचारी पूल उपलब्ध करून देण्यात आला आहे. गंजलेले लोखंड आणि पुलावरचे नाहीसे झालेले पत्रे यामुळे आता पूलही जीर्ण झाला आहे. तर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रेल्वे स्थानाच्या टोकाला हा पूल उभारण्यात आल्यामुळे नागरिकांना संपूर्ण फलाट चालून हा पूल गाठावा लागतो.

त्यामुळे अनेकदा कामावर जाणारे कर्मचारी, मजूर तसेच विद्यार्थी पुलाचा पर्याय न वापरता थेट रेल्वे रुळ ओलांडून फलाटांमधले अंतर पार करत असल्याची तक्रार संतप्त नागरिकांनी केली आहे. तसेच एका फलाट ओलांडणे सोयीचे जावे म्हणून रेल्वे रुळांवर लाकडाचे ओंडके ठेवण्यात आल्याचे, पाय ठेवण्यासाठी फलटांच्याकडेला छिद्र मारल्याची धक्कादायक बाब या चित्रफितीतून समोर आली आहे.

अपघातानंतर रुळ ओलांडण्याच्या मार्गांवर जाळ्या

रुळ ओलांडून रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांकडून उघड्या मार्गांचा वापर केला जात होता. गेले अनेक महिने हे मार्ग असेच सुरू होते. मात्र, अपघात झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तात्पुरत्या सुरक्षा जाळ्या लावून हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र, या भागात एकही सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आला नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

रुळावरून जाणाऱ्या गाड्यांबाबत घोषणा नाही

वैतरणा रेल्वे स्थानकातून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांव्यतिरिक्त मालगाड्याही ये-जा करत असतात. मात्र, याची घोषणा केली जात नसल्याने प्रवाशांना या गाड्यांचा अंदाज येत नाही आणि रेल्वे रुळ ओलांडतात व अपघात घडतात. त्यामुळे याबाबत आधी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी चित्रफितीच्या माध्यमातून करण्यात आली.