वसई: विरारजवळील वैतरणा व वाढीव बेटावर राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वाहतूक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना रेल्वे रुळावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

​पश्चिम रेल्वेवरील विरारवरून डहाणूच्या दिशेने प्रवास करताना वैतरणा-वाढीव परिसर लागतो. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथे ये-जा करण्यासाठी रस्ता किंवा योग्य सुविधा उपलब्ध होऊ शकलेली नाही. सध्याच्या स्थितीत येथील नागरिकांना रेल्वे पुलावरूनच अत्यंत धोकादायक प्रवास करावा लागत असून, यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.

वाढीव भागातील मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी शिक्षणासाठी वैतरणा येथील शाळेत जातात. या विद्यार्थ्यांनाही दररोज रेल्वे रुळांवरूनच प्रवास करावा लागतो. अलीकडेच ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ मार्गिका सुरू झाल्याने या मार्गावरील मालवाहतूक गाड्यांची संख्या वाढली आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका अधिकच गंभीर बनला आहे. जिल्ह्यात सध्या मोठे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी साधी मार्गिकाही अजून तयार करण्यात आलेली नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.

मालगाड्या किंवा एक्स्प्रेस गाड्या येतात, तेव्हा नागरिकांना घाईघाईने रेल्वे रुळावरून बाजूला होऊन एका कडेला उभे राहावे लागते. कामधंद्यासाठी तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरिकांना वैतरणा रेल्वे स्थानकापर्यंतच पायी जावे लागते. गॅस सिलेंडर, तांदळाची पोती आणि इतर अवजड सामान डोक्यावर घेऊन रेल्वे पुलावरून चालत जावे लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले. यासाठी योग्य ती वाहतूक व्यवस्था आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

​खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्याकडून परिसराची पाहणी

​वैतरणा–वाढीव बेटावरील विद्यार्थी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या या गंभीर समस्येची दखल घेत खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी शनिवारी रेल्वे अधिकाऱ्यांसह रेल्वे रूळ आणि रेल्वे स्थानक परिसराचा पाहणी दौरा केला. यावेळी आमदार राजन नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील व नागरिक उपस्थित होते. यावेळी खासदारांनी स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि याप्रश्नी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

वाढीव आणि वैतरणा या दोन्ही भागांना जोडण्यासाठी कायमस्वरूपी पुलाची उभारणी व्हावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेचवाढीव भागातील नागरिकांना सध्या अन्य कोणताही पर्याय नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात फेरीबोट सुरू करण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. रेल्वे स्थानक परिसरात ज्या समस्या उद्भवत आहेत, त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

​रेल्वे स्थानकातील प्रलंबित समस्यांकडे वेधले लक्ष

​डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने वैतरणा रेल्वे स्थानकातील विविध प्रलंबित समस्यांबाबत खासदार डॉ. हेमंत सवरा यांना निवेदन देण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष सतीश गावड यांनी सांगितले की, खालील मुद्द्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात भुयारी मार्गात साचणारे पाणी आणि स्थानकाबाहेरील रस्त्यांची झालेली दुरवस्था. प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आणि सुरक्षित पर्यायी मार्गाची उपलब्धता. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने डीएफसीसी रेल्वे मार्ग ओलांडण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, यासाठी तातडीने सुरक्षित पदपथ किंवा पादचारी पूल तयार करण्यात यावा अशी मागणी केली आहे.