वसई: दिल्लीतील आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि पोलिसांकडून आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वसईत सर्वपक्षीय लोकशाही बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे.

नीट पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीने, विद्यार्थी आणि तरुणांनी पुकारलेल्या आंदोलनाने व्यापक स्वरूप धारण केले आहे. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून जबरदस्ती हटविणे तसेच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या तरुणांना झालेली मारहाण या विरोधात देशभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना ( ठाकरे गट), भारतीय कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टी यांच्यातर्फे संयुक्तपणे बुधवार, २२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पार्वती क्रॉस माणिकपुर मैदानापासून महापालिकेच्या एच प्रभाग समिती कार्यालयापर्यंत लोकशाही बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे.

हा मोर्चा शिक्षण क्षेत्रातील अनियमितता व भ्रष्टाचाराच्या विरोधात, तसेच महात्मा गांधी यांच्या मार्गाने घेतलेल्या उपोषण व आंदोलनाच्या समर्थनार्थ काढण्यात येणार आहे. तसेच दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेधही यावेळी नोंदवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्च्यात सामील व्हावे, असे आवाहन मोर्च्यात सामील होणाऱ्या राजकीय पक्षांकडून करण्यात आले आहे.