वसई: भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी हा सण साजरा केला जातो. पण, वसई विरार शहरात मात्र यंदा अनोख्या पद्धतीने होळी सण साजरा केला जाणार आहे. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांनी एकत्र येत सर्वधर्मीय होलिकोत्सवाचे आयोजन केले आहे.
दिवाळीनंतर साजरा केला जाणारा महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे होळी. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा व्हावा यासाठी सर्वांची लगबग सुरू झाली आहे. घरोघरी पुरणपोळी, कटाची आमटी अशा गोडधोड जेवणाची तयारी सुरू झाली आहे. तर रंगीबेरंगी गुलाल, पिचकाऱ्या, होळी विशेष कपडे, होळीच्या दहनासाठी लागणारे साहित्य याने बाजार सजला आहे.
यंदा २ मार्चला होळी तर ३ मार्चला रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. पण, या पारंपरिक सणाच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा आणि एकोप्याचा संदेश देण्यासाठी वसईत सर्वधर्मीय होलिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. होळी, शुभ शुक्रवार म्हणजे गुड फ्रायडे, आणि पवित्र रमजान महिना या तिन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर वसईतील उमेळा येथील ‘अभंग भवन’ येथे उद्या, मंगळवार ३ मार्च रोजी विशेष ‘सर्वधर्मीय होलिकोत्सव’ आणि ‘उपवासकालीन चिंतन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान विविध धर्मातील अनुयायी एकत्र येऊन हा सण साजरा करणार आहेत.
“पापाचे दहन व्हावे आणि सत्याचा विजय व्हावा” या मुख्य उद्देशाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरीज येथील लेनी परेरा असणार आहेत. तर फादर मायकल जी आणि अपंग सेवा, कृपा फाउंडेशन, मद्यमुक्ती संघ, माणिकपूर, पाचू बंदर आणि सांडोर येथील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या सोहळ्याचे सामाजिक संस्थांचे सदस्य आपल्या आयुष्यातील अनुभव सांगत जीवनप्रवास उघड करणार आहेत. उपस्थितांच्या मनात आध्यात्मिक जाणीव जागृत करण्यासाठी विविध भक्तीगीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘सामुदायिक प्रायश्चित्त विधी’ पार पडणार असून, त्यात प्रतीकात्मकरीत्या पापदहन करून कपाळाला राख फासण्याचा विधी करण्यात येणार आहे…
