वसई: वसई पूर्वेतील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अंबाडी पूल ते एव्हरशाईन रस्त्याची अवघ्या दोन वर्षांतच दयनीय अवस्था झाल्याने, वसई-विरार महानगरपालिकेने ठेकेदारावर कडक कारवाई केली आहे. कामात गंभीर निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी ‘मे. जैन कन्स्ट्रक्शन कंपनी’ला पालिकेने एका वर्षासाठी काळ्या यादीत टाकले आहे.
वसई आणि विरार या दोन्ही शहरांना जोडणारा अंबाडी ते एव्हरशाईन रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भागात सखलपणामुळे पाणी साचून वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने ९ कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून रस्त्याची उंची १ मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या कामाचा ठेका ‘मे. जैन कन्स्ट्रक्शन कंपनी’ला देण्यात आला होता. मात्र, एवढा अवाढव्य निधी खर्च करूनही अवघ्या दोन वर्षांतच रस्त्याची चाळण झाली. चालू पावसाळ्यात तर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज वाहतूक कोंडीची भीषण समस्या निर्माण होत असून, नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. ठेकेदाराच्या या निकृष्ट कामाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता, तसेच आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.
रस्त्याची उंची वाढवताना निकृष्ट दर्जाचा माती भराव करणे, तांत्रिक त्रुटी ठेवणे, कामात अनियमितता करणे आणि वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे अशा अनेक बाबी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्या होत्या. याप्रकरणी पालिकेने कंत्राटदाराला तब्बल १४ नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, कामात कोणतीही सुधारणा न झाल्याने ७ मे २०२६ रोजी ‘कारण दाखवा नोटीस’ पाठवून ११ मे रोजी वैयक्तिक सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान कंपनीला आपला बचाव सिद्ध करता आला नाही.
ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून पालिकेवरही नाहक अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी ३१ जुलै रोजी ‘मे. जैन कन्स्ट्रक्शन कंपनी’ला वर्षभरासाठी काळ्या यादीत टाकल्याचे पत्र जारी केले. तसेच, रस्त्याच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च या कंत्राटदाराच्या सुरक्षा ठेव (डिपॉझिट) आणि प्रलंबित देयकांमधून वसूल केला जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
