वसई: वसई तालुक्यातील महसुली प्रकरणांतील अपीलांची सुनावणी वसईतच व्हावी याकरिता गुरुवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाचा सुरुवात करण्यात आली. या न्यायालयामुळे वसईतील महसुली प्रकरणांना गती मिळून सर्वसामान्यांना न्याय त्वरित मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही काळात वसईतील महसूली प्रकरणात लक्षणीय वाढ झाली आहे. पण, या प्रकरणांच्या सुनावणीसाठी नागरिकांना जव्हार येथील अपर जिल्हाधिकारी मुख्यालयात पायपीट करावी लागत होती. त्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस वसई तालुक्यात येऊन येथील महसुली अपिलांची सुनावणी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी यासंबंधीचे निवेदन ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर केले होते.
तर या मागणीची दखल घेत महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुरुवार १३ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी न्यायालय सुरु करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना, महसुली अपिलांची प्रलंबित संख्या कमी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू असून लवकरात लवकर प्रकरणांचे निर्णय दिले जातील, अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी दिली.
तर शासनाच्या निर्देशानुसार नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी त्यांच्याकडील प्रकरणे जास्त काळ प्रलंबित न ठेवता तात्काळ न्याय दिला जाईल, अशी ग्वाही अपर जिल्हाधिकारी फटांगरे यांनी दिली. तसेच या कामात गती राखण्यासाठी त्यांनी उपस्थित वकिलांना सहकार्य करण्याचे आणि प्रकरणांमध्ये अनावश्यक तहकूबी (Adjournment) न मागण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी फटांगरे, उपविभागीय अधिकारी शेखर घाटगे, ज्येष्ठ वकील मोजेस रॉड्रिग्ज, ॲड. विल्यम फर्नांडिस, ॲड. भरत पाटील, ॲड. दर्शना त्रिपाठी यांच्यासह इतर वकील, पक्षकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
