वसई: वसई ते अर्नाळा रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठते परंतु प्रशासनाने अजून त्यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे यंदाही हा रस्ता पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
वसईच्या पश्चिम पट्टय़ातील वसई -अर्नाळा रस्त्यावरील नाळे भागांतील भाऊसाहेब वर्तक शाळा (गणेश पार्क ) ते बोडण नाका (राज गॅरेज) पर्यंतचा रस्ता फारच सखल आहे. त्याच रस्त्याच्या एका बाजूचे गटार सुमारे तीन ते चार फूट उंच बांधण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा नीट निचरा होत नाही. मागील वर्षीप्रमाणे येथे पाणी साचू नये, यासाठी यंदा आधीच उपाययोजना करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. मात्र पावसाळा तोंडावर आला तरीही काही झालेले नाही, असे सामाजिक कार्यकर्ते चार्ली रोझारिओ यांनी सांगितले.
गणेश पार्क ते राज गॅरेजपर्यंत रस्त्याच्या गटाराच्या एका बाजूला बांधलेले चार फुटांचे बांधकामावर त्वरित पाडून बाजूच्या गटारांची उंची समान करून व येथील सखल रस्तासुद्धा समान पातळीवर केल्यास पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊ शकतो. याशिवाय राणेभाट ते सत्पाळा तलावापर्यंत रस्त्यावरील दोन्ही बाजूंची गटारे साफ आणि पुरेशी खोल करून सत्पाळा तलावामार्गे पाणी पश्चिमेस खाडीला सोडणे महत्त्वाचे आहे. असे असताना यावर केवळ वरच्या वर मलमपट्टी केली जाते. वसई अर्नाळा रस्त्यावर नाळा मराठी शाळा येथीलसुद्धा गटारे साफ करून पाणी पश्चिमेस खाडीला सोडल्यास पावसाळय़ात पाण्याचा योग्य निचरा होईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आतातरी याविषयी योग्य त्या उपाययोजना करुन येथील पाण्याचा निचरा योग्य होण्याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.