वसई : वसईतील प्रसिद्ध चित्रकात संजय म्हात्रे यांच्या अक्षरनाद या चित्र प्रदर्शनाचे आयोजन मुंबईतील जहागीर कलादालनात करण्यात आले आहे. सोमवार, २ फेब्रुवारीपासून हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले केले जाणार आहे.

वसईतील जुचंद्र गाव हे कलाकारांचे गाव म्हणून ओळखले जाते. चित्रकला, हस्तकला, रांगोळी, शिल्पकला अशा विविध कला अंगी जोपासणारे कलाकार या गावात वास्तव्यास आहेत. तर याच गावातील संजय म्हात्रे हे गेल्या तीस वर्षापासून कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. जुचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात ते कलाशिक्षक म्हणून काम करतात. पण, मुलांना चित्रकलेचे धडे देण्याबरोबरच कलाक्षेत्रातही त्यांनी स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

जलरंग, तैलरंग, ऍक्रेलिक, अशा विविध माध्यमांबरोबर लाकूड, धातू व सिपोरेक्स यांचा वापर करून अनेक म्युरल कलाकृतीची त्यांनी तयार केल्या आहेत. त्यांची ही चित्रे अमेरिका, जर्मनी, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांबरोबरच भारतातील अनेक कलारसिकांच्या संग्रही आहेत.

तर अक्षरलेखन (कॅलिग्राफी), चित्रकला आणि अध्यात्माचा अनोखा संगम असणारे अक्षरनाद हे संजय म्हात्रे यांचे चित्रप्रदर्शन सोमवार, २ फेब्रुवारीपासून रविवार ८ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत दक्षिण मुंबईतील जहागीर कलादालनात भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन कलारसिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा अनोखा संगम असणाऱ्या या कलाकृतींमध्ये ओम, श्री, भारतीय संस्कृतीतील श्लोक व प्रतीके यांचा वापर बहुतांश चित्रांमध्ये दिसून येतो. तर तांबडा, पिवळा, नारंगी, निळा आणि हिरवा या रंगांचा वापर प्रामुख्याने केल्याने चित्रातील अध्यात्मिकता अधिक ठळकपणे रसिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य स्पष्ट करताना चित्रकार संजय म्हात्रे म्हणाले की, “प्रत्येक शब्द व अक्षर स्वतःचा आकार, अर्थ, व नाद घेऊन येत असतात, अक्षरांच्या या गुणवैशिष्ट्यांना दृश्यमानता देऊन रंग, रेषा व माध्यमे यांच्या सहाय्याने विविध प्रयोग करून कॅनव्हासवर चितारण्याचा प्रयत्न मी केला आहे.”