वसई: महाराष्ट्रात रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकविण्याची भूमिका राज्य शासनाकडून घेण्यात आली आहे. त्यानुसार कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखा यांच्याकडून शहरात विविध ठिकाणी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात अमराठी रिक्षाचालकांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मिरा भाईंदरमधील आमदारांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपातून निर्माण झालेल्या या वादाला अवघ्या काही महिन्यातच गंभीर स्वरूप प्राप्त झाले. तर, हा वाद क्षमवण्यासाठी अमराठी रिक्षा चालकांना मराठीचे धडे देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच यासाठी १५ ऑगस्ट ही कालमर्यादा लागू करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारण्यात येणार असल्याची, तसेच रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्ये ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली होती.

त्यानुसार राज्यभरात विविध ठिकाणी ही अभ्यास केंद्रे सुरू करण्यात आली आहे. तर मोठ्या संख्येने अमराठी रिक्षाचालक वास्तव्यास असणाऱ्या वसई विरार शहरातही महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी माझी संवाद भाषा” या कार्यक्रमांतर्गत अमराठी आणि परप्रांतीय रिक्षाचालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण विनामूल्य असून आठवड्याला एक तास याप्रमाणे चार आठवड्यात एकूण चार तासात हे प्रशिक्षण पूर्ण होणार असून, हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस शासनातर्फे विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.हे प्रमाणपत्र अमराठी रिक्षाचालकांना परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असणार आहे, अशी माहिती कोमसापचे वसई शाखेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिली. तसेच यामुळे मराठी भाषेचा प्रसार होण्यास हातभार लागेल अशी आशा व्यक्त करत, अधिक माहितीसाठी या क्रमांकावर ९८९०५६०९९९ संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.