वसई: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना पाच कोटींच्या अब्रूनुकसानीच्या पाठवलेल्या नोटीशीची ठाकूर यांनी जाहीर सभेत खिल्ली उडवली. मला फक्त ५ कोटींची नोटीस पाठवली. हा माझा अपमान आहे. माझी किंमत कमी केल्याबद्दल मीच आता पालकमंत्र्यांनावर अब्रू नुकसानची दावा दाखल करणार अशा शब्दांत ठाकूर यांनी पालकमंत्र्यांच्या नोटीशीची टर उडवली. शुक्रवारी बहुजन विकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजप तसेच ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला. ३५ वर्षांत आम्हाला कोणीही संपवू शकले नाहीत तर तुम्ही काय संपवणार अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

पालघर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी बहुजन विकास आघाडीने नालासोपारा येथील श्रीप्रस्थ येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुजन विकास आघाडीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. हितेंद्र ठाकूर यांनी डहाणू येथील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. आम्हाला बेडूक वैगरे उपमा देणारे वसई वसई वाल्यांना वसईतच संपवू अशा प्रकारची भाषा करणाऱ्यांनो मागील ३५ वर्षात आम्हाला कोण संपवू शकले नाही तर तुम्ही काय आम्हाला संपवणार अशा शब्दांत ठाकूर यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले वसई करांना संपवून टाकण्याची भाषा करून त्यांनी एकप्रकारे वसई करांचा अपमान आहे असेही ते म्हणाले. तर दुसरी बहुजन विकास आघाडीला मत म्हणजे भाजपला मत असा अपप्रचार केला जात आहे. हे दोन्ही पक्षच एकत्र होते आम्ही दोघांच्या विरोधात ठामपणे उभे आहोत, असे ठाकूर म्हणाले. आम्ही कधीही धार्मिक राजकारण केले नसून प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांना न्याय दिला असल्याचेते म्हणाले

हेही वाचा : पालकमंत्र्यांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

पालकमंत्र्यांच्या नोटिशीची उडवली खिल्ली

पालकमंत्री रवींद्र चव्हाण जिल्ह्यातून १०० कोटींची वसुली करत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता. त्यामुळे चव्हाण यांनी ठाकूरांना ५ कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. त्याची ठाकूरांनी खिल्ली उडवली. अधिकारी आणि ठेकेदारांच्या बैठका घेतल्या हे पालकमंत्री मान्य करतात. त्या बैठकीत कितीची मागणी केली ते आकडे मी सांगितले एवढंच. अधिकारी आणि ठेकेदार यांचा निवडणूक प्रचाराचा काय संबंध आहे असे ते म्हणाले. उलट मला फक्त ५ कोटींची नोटीस पाठवून माझी किंमत कमी केल्याने मीच त्यांच्यावर अबूनुकसानीचा दावा ठोकणार अशी उपहासातामक टिकाही त्यांनी केली.

हेही वाचा : पालघर जिल्ह्यातून १०० कोटींची वसुली, आमदार ठाकूरांचा पालकमंत्री रवींद्र चव्हाणांवर आरोप

उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका

वाढवण बंदराविषयी उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप बविआचे उमेदवार राजेश पाटील यांनी केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे तेथील नागरिक गेले होते. तेव्हा वाढवण बंदर हा केंद्राचा प्रकल्प आहे तुम्ही तिथे जा. त्यावेळी शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधिमंडळात १६ हजार कोटी रुपये मंजूर केले होते. आणि आता विरोध असल्याचे भाष्य सभेत करीत आहेत. त्यामुळे एकप्रकारे दुटप्पी भूमिका दाखवत आहेत असे पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : “पंतप्रधान हा देशाचा, मोदींनी भाजपाचा प्रचार करू नये”, उद्धव ठाकरे यांचा मोदी आणि शाहांवर घणाघात

आम्ही मंदिराच्या नावावर मत मागत नाही

माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्ला चढविला. मी अत्यंत धार्मिक आहे. आम्ही ठाकूर परिवारातर्फे प्रशस्त मंदिर बांधत आहोत. ज्यात सर्वांना प्रवेश असेल. पण मंदिर हा श्रध्देचा भाग आहे. आम्ही मंदिर बांधलं आम्हाला मत द्या, असं आम्ही सांगत नाही. मंदिराच्या नावावर मते मागणारे मोदी धार्मिक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सभेत माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर आणि पक्षाचे नेते राजीव पाटील, सगीर डांगे, बनबशेठ नाईक आदींची भाषणे झाली.