वसई: प्रभाग समिती एफमधील पारंपरिक बावखल बुजवून त्यावर इमारती उभारण्यात येत असल्याचा आरोप करत, बावखल संवर्धनासाठी सोमवारी एमआयएम पक्षाने वसई तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच बावखलांचे सर्वेक्षण होत नाही तोवर बांधकामांना दिलेली परवानगी स्थगित करण्यात यावी व बावखले बुजवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
वसई विरार महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग समिती एफ धानिव/पेल्हार, या ठिकाणी गांव मौजे पेल्हार, सर्व्हे क्र. ३५२/क, सर्व्हे क्र. ५/१, सर्व्हे क्र. २७३/२ अ, सर्व्हे क्र. २७३, २४४, या ठिकाणी l पारंपरिक बावखले अस्तित्वात होती. मात्र, या जागेवर विकासकांनी अनधिकृतपणे मातीचा भराव करून बावखले बुजवली व त्यावर वाणिज्य इमारतीचे बांधकाम केले आहे.
१९९९ ते २०१२ च्या ड्रोन सर्वेक्षण, गुगल मॅप, तसेच महानगरपालिकेच्या डी.पी.प्लानमध्ये बावखल स्पष्ट दिसत असूनही महापालिकेचा नगररचना विभागाकडून बांधकाम परवानग्या देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायलयाकडून १६ जुलै २०२४ रोजी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनासाठी नैसर्गिक बावखल न बुजवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तरी सुद्धा या भागात मोठ्या प्रमाणावर इमारती बांधल्या जात आहेत.
त्यामुळे बावखल वाचवण्यासाठी व अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी सोमवारी एमआयएम पक्षाने तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात वसई विरार जिल्हा पालघरचे अम्मार अब्दुल्लाह पटेल, महिला अध्यक्ष रुबीना अम्मार पटेल, इकबाल शेख, कफील खान, जहीर अंसारी, फ़हीम ख़ान, शोएब खान, शहजाद चौधरी,शादाब आज़मी, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी पेल्हार विभागातील सर्व बावखलांचे फेर निरीक्षण करण्यात यावे. तसेच सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत वसई विरार महापालिकेने बांधकाम करण्यासाठी दिलेल्या सर्व परवानग्या स्थगित करण्यात याव्यात. या बांधकामांना महापालिकेने कुठलीही सोयीसुविधा देऊ नये व नैसर्गिक बावखल बुजवणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तर या मागण्यांची दखल घेत तहसीलदारांनी सर्व बावखलांची पाहणी करण्यासाठी विशेष मंडळाची स्थापना करण्याचे व पाहणी करून अनधिकृत भराव करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
