वसई: पालघर जिल्हा प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कडक कारवाई केली आहे. १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त केलेले वसई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. वसई विरार भागात जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी विविध विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करून ही कामे मार्गी लावली जात आहेत. मात्र काही कर्मचारी कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशावर आता जिल्हाधिकारी यांनी थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

वसई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी यांची ही १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.मात्र चौधरी यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहून निवडणूकविषयक कामकाजात हलगर्जीपणा व टाळाटाळ केली, ज्यामुळे या महत्त्वपूर्ण मतदारसंघातील काम अपूर्ण राहून प्रतिकूल परिणाम झाला.

या गंभीर बाबीची दखल घेत पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० अन्वये शिस्तभंगाची कारवाई करत चौधरी यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषद पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा कार्यक्रम अत्यंत कालबद्ध व महत्त्वाचा असल्याने कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.