वसई:- विरार पूर्वेकडील मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका संशयास्पद आणि अघोरी कृत्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भारोळ गावच्या हद्दीत असलेल्या पादचारी पुलाजवळील एका निर्जन ठिकाणी हे अघोरी पूजेचे साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे
संपूर्ण परिसरात भीतीचे व संशयाचे वातावरण पसरले आहे.
पानावर लिहिलेल्या ‘त्या’ नावामुळे खळबळ
पुलाजवळ एका लाल रंगाच्या कपड्यावर ठेवलेल्या टोपलीत काळा दोरा, हार-फुले आणि अघोरी पूजेचे विविध साहित्य ठेवण्यात आले होते. या साहित्यात सापडलेल्या एका वाळलेल्या पानावर ‘कुणाल किशोर वाघेला’ असे नाव स्पष्ट अक्षरात लिहिलेले दिसून आले. एका पानावर नाव लिहून अशा प्रकारे अघोरी पूजा करण्यामागचा नेमका उद्देश काय, हे नाव कोणाचे आहे आणि त्याचा या साहित्याशी काय संबंध आहे, याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
या धक्कादायक घटनेमुळे भारोळ आणि आसपासच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या कृत्यांचा वेळीच बीमोड करावा आणि पोलीस प्रशासनाने यामागचे सत्य लवकरात लवकर समोर आणावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. भारोळ गावच्या हद्दीत सापडलेल्या या पूजेच्या साहित्याबाबत माहिती मिळाली असून याचा तपास सुरू असल्याचे मांडवी पोलिसांनी सांगितले.
