वसई: रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी शनिवार व रविवारी पश्चिम रेल्वेकडून वसई आणि भाईंदर स्थानकांदरम्यान उपनगरीय मार्गावर मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट व ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री ‘अप’ जलद मार्गावर २३:३० ते ३:०० वाजेपर्यंत आणि ‘डाऊन’ जलद मार्गावर ०१:१५ ते ४:४५ वाजेपर्यंत हा जम्बो ब्लॉक घेतला जाईल.

ब्लॉकच्या कालावधीत जलद मार्गावरील सर्व गाड्या विरार ते भाईंदर/बोरीवली स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. तसेच या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द राहतील. रद्द करण्यात आलेल्या लोकल फेऱ्यांची सविस्तर यादी रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असेल.

दरम्यान, रविवार ३० ऑगस्ट २०२६ रोजी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.