वसई: वसई ते भाईंदर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या बोट सेवेवर देखील मुसळधार पावसाचा परिणाम झाला आहे. सलग दोन दिवस रो-रो सेवा बंद पडल्यानंतर आता तिसऱ्या दिवशीही दुपारनंतर वसई भाईंदर दरम्यानची रो-रो सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

वसई भाईंदरदरम्यान सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीमार्फत फेरी बोटी चालवल्या जातात. दोन्ही शहरांना थेट जोडणाऱ्या मार्गांचा अभाव, महामार्गावर असणारी वाहतूककोंडी आणि लोकलमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास असणारी गर्दी यामुळे वसई भाईंदरदरम्यान प्रवास करणारे प्रवासी रो-रो सेवेचा पर्याय निवडतात. तर पावसाळ्याच्या दिवसात शहरात जागोजागी पाणी साचल्यानंतर किनारी भागातील तसेच खाजगी वाहने असणारे नागरिक रो-रोने प्रवास करण्यास प्राधान्य देतात.

तर पावसाळ्यात वेगाने वाहणारे वारे, समुद्राला येणारी भरती, लाटांचा बसणारा तडाखा यामुळे रो-रो सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असल्यामुळे चालकांकडून नुकतेच पावसाळी वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणारे वादळी वारे, मुसळधार ते अतिमुसळधार कोसळणारा पाऊस, समुद्राला येणारे उधाण यामुळे रो-रो सेवेवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाच्या सूचनेनुसार रविवार आणि सोमवारी वसई भाईंदर रो-रो सेवा बंद ठेवण्यात आली होती. तर त्यानंतर मंगळवारीही दुपारी १२ नंतर रो-रो सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.