वसई: मंगळवारी साजरा होणाऱ्या वेलंकन्नी मातेच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी रो-रोकडून वाढीव फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. वसई ते भाईंदर दरम्यान या विशेष फेऱ्या चालवल्या जाणार असून यामुळे उत्तन येथील वेलंकनी चर्चमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
तामिळनाडू राज्यातील नागापट्टिनम जवळील ‘अवर लेडी ऑफ गुड हेल्थ’ या प्रसिद्ध वेलंकनी चर्चमध्ये दरवर्षी वेलंकनी मातेचा सण म्हणजेच नोव्हेना साजरा केला जातो. यंदाही २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान हा सण साजरा केला जात आहे. यासाठी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमधून मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव तामिळनाडू शहरात दाखल होतात. तर वसई आणि भाईंदरमधील उत्तन सारख्या ख्रिस्तीबहुल भागातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यासाठी दोन्ही शहरातील भाविक उत्तन येथील भाटेबंदर परिसरातल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या वेलंकनी चर्च येथे दर्शनासाठी जातात. मात्र, वसई आणि भाईंदरदरम्यान थेट रस्ता उपलब्ध नसल्याने वसई-विरारमधील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरून लांबचा वळसा घालून भाईंदरला जावे लागते. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक नागरिक जलप्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळेच या उत्सवादरम्यान रो-रोच्या विशेष फेऱ्या सुरू करण्याची मागणी भाविकांकडून केली जात होती.
नागरिकांची ही मागणी विचारात घेऊन ‘सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि.’ने रो-रो सेवेच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार वसई आणि भाईंदर जेट्टीवरून सुटणाऱ्या बोटींच्या नियमित वेळापत्रकात सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात प्रत्येकी दोन फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीव फेरी सेवेबाबत किँवा तिकीट आरक्षणाबाबत अधिक माहिती हवी असल्यास प्रवाशांनी वसई केंद्र: ८६२४०६३९००/ भाईंदर केंद्र: : ८६००३१४७१० क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रो-रो फेरी वेळापत्रक:
सकाळची फेरी:
वसई किल्ला ते भाईंदर: सकाळी ६:३० वाजता
भाईंदर ते वसई: सकाळी ७:०० वाजता
रात्रीची फेरी:
वसई किल्ला ते भाईंदर: रात्री ९:४५ वाजता
भाईंदर ते वसई: रात्री १०:३० वाजता
