वसई: वसई आणि भाईंदर शहरांना जलमार्गाने जोडणारी रो-रो सेवा मुसळधार पावसामुळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, पावसाचा जोर ओसरल्यामुळे तीन दिवसांनी फेरी बोट पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत वसई-विरार आणि मिरा-भाईंदर भागात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. मुसळधार पाऊस, वेगवान वादळी वारे आणि समुद्राला आलेल्या उधाणामुळे खाडीत मोठ्या लाटा उसळत होत्या.

यामुळे सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाल्याने महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सूचनेनुसार सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनीने ही सेवा तात्पुरती स्थगित केली होती. सलग तीन दिवस ही सेवा बंद राहिल्यामुळे प्रवाशांना महामार्गामार्गे किंवा लोकल ट्रेनचा पर्याय निवडावा लागला होता, ज्यामध्ये प्रचंड वाहतूककोंडी आणि गर्दीचा सामना करावा लागला.

वसई ते भाईंदर हे अंतर रस्त्यामार्गे पार करण्यासाठी जवळपास ३० किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे या प्रवासासाठी एक ते दीड तास खर्च होतात. मात्र, रो-रोमुळे अवघ्या १५ ते २० मिनिटांत प्रवाशांना खाडी पार करता येते. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी ही जलवाहतूक अत्यंत सोयीची ठरते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि चोवीस तासांत पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी रो-रो सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.

गेले दोन-तीन पावसामुळे समुद्रातील पाण्याला प्रचंड उधाण आले होते. यामुळे जेट्टी परिसरात वेगाने वारे होते. तर दुसरीकडे यामुळे बोटही किनाऱ्यावर लावता येत नव्हती. तसेच वीज नसल्यामुळे तिकीट खिडकीही बंद ठेवावी लागली. पण, आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यामुळे रो-रो सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असल्याची माहिती, वसई-भाईंदर रो-रो सेवा व्यवस्थापक अरबाज शेख यांनी दिली.